• Sat. Sep 21st, 2024
भाजपची महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक? चर्चेतील अहवालावर अखेर विनोद तावडेंनीच केला खुलासा

मुंबई:आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची ताकद मोठ्याप्रमाणावर घटेल, असा भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा अहवाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विनोद तावडे यांच्या नेतृत्त्वाखाली नेमलेल्या समितीने हा अहवाल केंद्रीय नेतृत्त्वाला दिल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस २ सुरू केल्याची चर्चा सुरु आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांनी मंगळवारी रात्री ट्विट करुन स्पष्टीकरण दिले. या सगळ्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.

दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे, ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे, असे विनोद तावडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

५० नाही, विधानसभेला १२६ जागा सोडाव्याच लागतील, कीर्तिकरांनी भाजपला ठणकावलं

विनोद तावडेंच्या अहवालाबाबत नेमकी काय चर्चा होती?

भाजपकडून लोकसभा निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक राज्याचा आढावा घेत असून त्यानुसार भाजप पुढील रणनीती निश्चित करेल. या समितीचे निमंत्रक म्हणून विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप कोणत्या जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता, याचीही माहिती समितीकडून घेतली जात आहे. या अभ्यासाअंती भाजपच्या या केंद्रीय समितीकडून संबंधित राज्यातील संघटनात्मक कार्यक्रम, नेत्यांच्या कार्यक्रमाचे आणि दौऱ्यांचे नियोजनही केले जाईल.

महाविजय २०२४, भाजपचा संकल्प, फडणवीसांच्या विश्वासू मोहऱ्यावर निवडणुकांची जबाबदारी

विनोद तावडेंच्या या समितीने महाराष्ट्राबाबत नकारात्मक अहवाल दिल्याची चर्चा होती. २०२४ साली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपचे संख्याबळ दुहेरी आकड्यात घटले. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे ४२ खासदार निवडून आले होते. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला लोकसभेच्या फक्त २२ ते २५ जागांवरच विजय मिळेल, असा अंदाज तावडेंच्या अहवालात वर्तविण्यात आल्याची चर्चा होती. तसेच कर्नाटक आणि बिहारमध्येही लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसेल, असे या अहवालात नमूद केल्याचे सांगितले जात होते. या अहवालामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाची चिंता वाढली होती. त्यामुळे भाजपने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस-२ सुरु करण्यात आले आहे. ऑपरेशन लोटस अंतर्गत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये आणले जाणार असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु झाली होती.

गेल्यावेळी तिकीट नाकारलं, यंदा उमेदवारी मिळवून शिंदेंच्या शिलेदाराला धूळ चारणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed