काय म्हणाले अजित पवार?
खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजीत कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. 18 एप्रिल 2023 रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमीत कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्यापूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी, असं ट्वीट अजित पवार यांनी केलं आहे.
काय आहेत चर्चा?
राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार गेल्या आठवड्यात अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी माध्यमांसमोर आले. तेव्हापासून अजित पवार वेगळा विचार कऱण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची चार दिवसांपूर्वी महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्यावरुन विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
गेल्या आठवड्यात बारामती होस्टेल येथे नियोजित बैठका उरकल्यानंतर अजित पवार फुरसुंगी येथे एका कार्यक्रमाला निघाले. मात्र कार्यक्रमाला न जाता हडपसर इथूनच त्यांनी यूटर्न घेत सगळे दौरे रद्द केल्याची चर्चा माध्यमांत रंगली होती.
जागरणं, दौरे जास्त झाली की मला पित्ताचा त्रास होतो. डॉक्टरांकडून गोळ्या आणून मी शांतपणे झोपलो होतो. मला इतकं वाईट वाटत होतं, की अजित पवार नॉट रिचेबल वगैरे काही पण दाखवत होते. तुम्ही आधी खात्री करुन घ्या, कारण नसताना एखाद्याची किती बदनामी करायची, आम्ही पब्लिक फिगर असल्याने तुम्हाला अधिकार आहे, पण शेवटी आम्ही माणूसच आहोत, अशा शब्दात अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.