या आंदोलनावेळी महापालिकेचे सर्व गेट बंद करण्यात आले होते. मात्र, सदाभाऊ खोत यांनी गेटवर चढून महापालिका इमारतीच्या आवारात प्रवेश करत थेट महापालिकेच्या समोरच कांदे विकले आहे. यावेळी सदाभाऊ खोत यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. ‘आज राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. विरोधकांना सत्तेचे डोहाळे लागलेत सत्ताधाऱ्यांचं या माजलेल्या अधिकाऱ्यांकडे लक्ष नाही.’ अशी टीका खोत यांनी केली आहे.
महापालिकेवर मोर्चा, कांदा विक्री शेतकऱ्यांचा टेम्पो जप्त, सदाभाऊंचं थेट गेटवर चढून महापालिकेत आंदोलन
दुसरीकडे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचा देखील सदाभाऊ खोत यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. ‘माधव जगताप नावाचा वळू बैल गेली अनेक वर्ष याच महापालिकेत ठाण मांडून बसलेला आहे. त्याने रमेश आरगडेचा टेम्पो अडवून ठेवला आहे. आम्ही आज त्याला विचारायला आलो आहोत. तू नक्की शेतकऱ्यांची औलाद आहेस की बेइमानाची औलाद आहेस. नुसतं विचारायला आलो नाही तर हिम्मत असेल आता इथं येऊन आमचे कांदे जप्त करून दाखव, मग कळेल हे मातीतील शेतकरी काय आहेत.’ असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
एकीकडे सरकार ‘पिकेल ते विकेल’ योजनेचे घोडे मिरवत आहे. दुसरीकडे भाव मिळत नाही म्हणून गावच्या शेतकऱ्यांनी शहराकडे धाव घेतली तर सरकारी खुर्ची उबवणारे बाबू मात्र शेतकऱ्यांची कोंडी करत आहेत. आधीच अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आला असताना प्रशासनाचा सुलतानी जाच सुद्धा त्याच्या वाटेवर आहेच. अशा परिस्थितीत सत्तेच्या मोहिनीत मश्गुल असणारे सरकार आणि सत्तेचे डोहाळे लागलेले विरोधी पक्ष तरी शेतकऱ्यांकडे पाहणार का हा प्रश्नच आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
