• Sat. Sep 21st, 2024

उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे  त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे

ByMH LIVE NEWS

Apr 15, 2023
उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे  त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे

मुंबई, दि. १५ : केंद्र व राज्य शासन, विविध आस्थापना व त्यांचे अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, महापालिका, तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचे तिमाही विवरणपत्र येत्या ३० एप्रिलपर्यंत सादर करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

दर तिमाहीअखेर (मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर) विवरण सादर करणे बंधनकारक आहे. पंचवीस किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार कारखाने यांना सेवायोजन कार्यालये यांनी रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा १९५९ व अंतर्गत नियमावली १९६० नुसार मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ईआर-१ प्रत्येक तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या उद्योजकांनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्या उद्योजकांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. हे विवरणपत्र (ER-I) हे ऑनलाईन पध्दतीने https://rojgar.mahaswaym.gov.in  या वेबपोर्टलवर सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करुन ३० एप्रिल २०२३ पर्यंत विवरणपत्र (ईआर-१) सादर करावे, असे आवाहन श्री. रविंद्र प्र. सुरवसे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्हा अंतर्गत येणारे सर्व नियोक्ते / आस्थापना यांनी https://rojgar.mahaswaym.gov.in  या वेबपोर्टलवर तिमाही विवरणपत्र ईआर १ सादर करण्याची दक्षता घ्यावी. या वेबसाइटच्या एम्प्लॉयर (List a Job ) या टॅबवर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉगइनमध्ये युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगइन करावे आणि ईआर रिपोर्टमध्ये ईआर -१ या ऑप्शनवर क्लिक करुन तिमाही विवरणपत्र ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहिती / मार्गदर्शन अथवा तांत्रिक अडचण असल्यास [email protected]  या ईमेलवर संपर्क करावा. ३१ मार्च २०२३ च्या तिमाही अखेर वेतनपटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाच्या माहितीचे विवरणपत्र ईआर १ हे ३० एप्रिल २०२३ पर्यंत महास्वयम वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. हे विवरणपत्र ऑफलाईन स्विकारले जाणार नाही, असे सहायक आयुक्त यांनी सुचित केले आहे.

 

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed