या घटनेत जखमी झालेले दीपक रमेश नवलानी (रा. सावेडी, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपींविरूद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील अमर हमीद शेख व रिजवान अमिन सय्यद (रा. पाच लिंब गल्ली, कापड बाजार) यांना अटक करण्यात आली. हमजा शौकत आली शेख व त्याचा धाकटा भाऊ (रा. मोची गल्ली, नगर) हे फरारी आहेत.
शुक्रवारी १४ एप्रिलच्या सायंकाळी कापड बाजारात ही घटना घडली. मिरवणुकीसाठी शहरातून वाहतुकीचे नियमन करण्यासाठी बॅरिकेडस लावण्यात येत होते. यातील आरोपी हमजा शौकतआली शेख याने त्याचे बांगडीचे दुकानाजवळ स्वतंत्र बॅरिकेटिंग केले होते. त्यामुळे नवलानी यांना दुकानात जाण्यासाठी अडथळा येत होता. म्हणून त्यांनी त्याला बॅरिकेटिंग (गेट) काढून घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपी व त्याचा धाकटा भाऊ यांनी नवलानी यांना शिवीगाळ केली. जवळ कुलपाचे दुकान असलेला रिजवान अमीन सय्यद हाही तेथे आला. त्याने नवलानी यांनी शिवीगाळ केली. इतरांच्या मध्यस्थीने त्यावेळी वाद मिटला. त्यानंतर सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास नवलानी व त्यांचे मित्र प्रणील बोगावत हे गप्पा मारत उभे होते. तेव्हा रिजवान अमिन सय्यद याचा जावई अमर हमीद शेख तेथे आला. त्याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने नवलानी यांच्या छातीवर आणि पोटावर वार केले. प्रवीण बोगावत यांच्यावरही वार केले. जखमींवर उपचार सुरू आहेत.
या घटनेचे तीव्र पडसाद व्यापारी संघटनांमध्ये उमटले. नगर शहरातील बाजारपेठ शनिवारी बंद ठेवण्यात आली. व्यापारी संघटनांनी एकत्र येत हे आंदोलन केले. कापडबाजारात ठिय्या देत अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये शहरातील लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी तसेच व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी’, ‘हम सब एक है’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शहरातील कापडबाजार, तेलीखुंटसह बाजारपेठेतील दुकाने बंद होती. पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
साईंचा आशीर्वाद, भक्तांसाठी खुशखबर; शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगला सुरुवात