• Sat. Sep 21st, 2024
सत्यपाल महाराजांकडून चुलीवरच्या बाबाची पोलखोल, सेम टू सेम कृती;लोकहो बाबा-बुवांना भुलू नका

अकोला : आपल्या देशात कुठे ना कुठे बुवा बाबा आपले चमत्कार दाखवतच असतात. कुणी रुद्राक्ष देणारा महाराज असतो, तर कोणी बेलपत्री वाहिल्यास चांगल्या गुणांनी पास होऊन जाणार असा दावा करणारा महाराज. अशाच महाराजांच्या गर्दीत आणखी एका नव्या महाराजाचा ‘उगम’ झालाय. या बाबाचा चक्क चुलीवरील गरम तव्यावर बसलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओमुळे चुलीवरील बाबा चांगलाच चर्चेत आला. हा बाबा होता अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातल्या मार्डीचा.गुरूदासबाबा असं त्याचं नाव. मात्र, कारवाईच्या भितीने हा बाबा नंतर गायब झाला. आता याच तव्यावाल्या बाबाच्या चमत्काराच्या दाव्याची पोलखोल महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांनी केली आहे.

सत्यपाल महाराजांनी स्वतः गरम तव्यावर बसून या तथाकतीत बाबाच्या दाव्यातील ‘पोलपणा’ उघड केला असून त्याचं सत्य सर्वांसमोर आणल आहे. सत्यपाल महाराज आपल्या किर्तनातून नेहमीच अंधश्रद्धेवर प्रहार करत असतात. नुकताच भंडारा जिल्ह्यात त्यांचा एक कार्यक्रम होता. त्यांच्याही नजरेत या चुलीवरील गरम तव्यावाल्या बाबाचा व्हिडिओ आला अन् बघताक्षणीच हा सर्व प्रकार बोगस असल्याचं जनजागृती करणाऱ्या महाराजांच्या लक्षात आलं. म्हणून महाराजांनी भंडारा जिल्ह्यातील निलज फाटा इथे एका मामा ठाकूर यांच्या झुणका भाकर केंद्रावर या तवेवाल्या बाबांनी जो ‘चमत्कार’ करून दाखवला तो प्रत्यक्षिकासह करून त्यातील खरं-खोटं उघड करून दाखवलं.

पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा पर्दाफाश, अंनिस कार्यकर्ते पोहोचले अन् थेट ‘तो’ डेमो दाखवला
सत्यपाल महाराज चक्क स्वत: गरम तव्यावर बसवून व्हिडिओ बनवत म्हणाले की बाबाहो.. आपण ऐकलं अन् पाहिलं आजकाल महाराज गरम तव्यावर बसतात, अन् शकले गेले, गरम लागायला लागलं की ते शिव्या देतात. पुढे म्हणाले की आज मी ज्या तव्यावर बसलो आहे, त्या तव्याखाली जाळ लावायला सांगितला. या धगधगणाऱ्या चुलीवरील तव्यावर महाराज तब्बल पावणे तीन तास बसले आणि हा सगळा भंपकपणा असल्याचं महाराजांनी जाहीर केलं.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ; एकाच रिक्षात १५ ते २० विद्यार्थ्यांना कोंबून प्रवास

महाराज म्हणाले की मी तव्यावर बसण्यापूर्वी एक तव्याच्याच रंगाचा काळा कापड ओला करून तव्यावर ठेवला. मी स्वतः जो टॉवेल गुंडाळला होता तो आणि माझी अंतर्वस्त्र सुद्धा ओली करून घेतली होती. त्यानंतर तव्यावर बसलो (तो तथाकथित महाराजही असच करायचा) आणि तव्याच्या एका बाजूलाच जाळ केला. मात्र त्यापासून थोड्या अंतरावर बसलो. त्यामुळे अशा प्रकारे तव्यावर कुणालाही बसता येईल. हा कुठलाही चमत्कार नसून ही सगळी फसवेगिरी आहे.

गरीब भोळ्या भक्तांच्या श्रद्धेचा फायदा घेत असे बोगस बाबा लोकांना लुबाडत असतात. काही वेळानंतर चटका नक्कीच लागतो. पण मग तेव्हा तो बाबा घाणेरड्या शिव्या द्यायला लागायचा, जेणेकरून लोक त्याला त्यावरून उचलून घेत होते. ही सरळ धूळफेक असून अशा प्रकारे सवंग प्रसिद्धी हे बाबा लोक घेत असतात.

कोण होता चुलीवरचा बाबा?

काही दिवसांपूर्वी राज्यभरात चुलीवरचे बाबा चर्चेत आले होते. चक्क चुलीवर तापलेल्या तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद आणि घाणेरड्या शिव्या देणाऱ्या महाराजाचा एक व्हिडिओ चांगलाचं व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील गुरूदासबाबा याचा होता. तो व्हिडिओ महाशिवरात्रीतला असल्याचा दावा केला जातो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मी कुठलंही अंधश्रद्धेचं काम करत नाही. मला दैवी शक्ती प्राप्त होते, त्यावेळी मला भान नसतं. मी अंधश्रद्धा पसरवत नाही, हा श्रद्धेचा भाग आहे. मी साधू संत नाही, असा दावा त्यावेळी या बाबाने केला होता.

चुलीवर बसलेल्या बाबाच्या आजुबाजूला लोकांची गर्दीही दिसत होती. हा बाबा स्वतःला सच्चिदानंद गुरुदास महाराज असं म्हणून घेतो. त्याचं खरं नाव सुनील कावलकर असं असल्याचं समजतं. तो पूर्वी मजुरी काम करायचा. आता पंधरा वर्षांपासून त्याने स्वतःला बाबा घोषित केल्याचं कळतं. आता या बाबाने चक्क चुलीवर बसण्याचा प्रकार केला. तव्याखाली चूल पेटत आहे आणि बाबांच्या एका हातात विडी आहे. विडी ओढत ओढत बाबा पाया पडायला येणाऱ्या भक्तांना आशिर्वाद देत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत होतं. त्याचा गरम तव्यावर बसून घाणेरड्या शिव्या देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांच्या भीतीने हा बाबा नंतर गायब झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed