सोमवारी प्राध्यापक असलेल्या रानोबा करांडे यांचे निधन झाले होते. आपला मित्र गेला आहे ही बाब मधुकर बाबर यांच्यासाठी धक्कादायक होती. प्रा. करांडे यांचे दर्शन घेण्यासाठी बाबर हे नानासाहेब हालंगडे व इतर सहकाऱ्या समवेत सांगली येथे गेले होते. मित्राचे अंतिम दर्शन घेऊन ते मंगळवारी सकाळी डिकसळ येथे आले. आपल्या मित्राला अखेरचा रामराम करताना ते ओक्साबोक्सी रडत होते. मित्राचं झालेलं आकस्मिक निधन बाबर यांच्या जिव्हारी लागलं होतं.
दुसऱ्या दिवशी हृदयविकाराचा झटका
मंगळवारी बाबर हे आपल्या शेतातील विहिरीच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. विहिरीला चांगले पाणी लागले. ही बातमी त्यांनी अनेकांना फोन करून सांगितली. एवढ्यात मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास काळाने घात केला. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मधुकर बाबर हे खाली कोसळले. त्यांना तातडीने सांगोला येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोन दिवसांत दोन जिवलग मित्र गेल्याने डिकसळ गावावर शोककळा पसरली आहे.
मयतीवरुन आले अन मधुकर बाबर गेले
प्राध्यापक रानोबा करांडे यांची माती करुन काही तास उलटत नाहीत तोच माजी मुख्याध्यापक असलेले मधुकर बाबर यांचे निधन झाल्याची बातमी डिकसळ गावात पसरली. ग्रामस्थांना याचा मोठा धक्का बसला. निधनाचे वृत्त समजताच अनेकांना अश्रू अनावर झाले. मधुकर बाबर यांच्या जाण्याने डिकसळ गावाचे कधीही न भरून नुकसान झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. मधुकर बाबर हे शेतकरी कामगार पक्षात कार्यरत होते. भाई गणपतराव देशमुख यांच्या सोबत त्यांचे घनिष्ट संबंध होते.