• Sat. Sep 21st, 2024
काँग्रेसला धक्का देऊन राष्ट्रवादीत जाणार? आशिष देशमुखांनी अखेर उत्तर दिलं…

नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज दिसून येत आहेत. देशमुख आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातला संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशा स्थितीत देशमुख राष्ट्रवादीच्या ताफ्यात सहभागी होऊन विदर्भात पवारांचं बळ वाढवू शकतात, अशा चर्चांनी जोर धरला होता. खुद्द शरद पवार यांनीही देशमुखांच्या शेतावर जाऊन यासंबंधी चर्चा केल्याचंही वृत्त होतं. या सगळ्या प्रश्नांवर खुद्द आशिष देशमुख यांनीच उत्तर दिलंय.

गेल्या आठवड्यात शरद पवार माझ्या शेतावर आले होते. त्यावेळी त्यांनी माझ्या शेतात उसाची लागवड पाहिली. विदर्भात उसाच्या पीकाला प्रोत्साहन देण्यासाठी ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपकेंद्राची स्थापना म्हसाळा गाव, हिंगणा येथे करणार आहेत. त्यानिमित्त त्यांनी कन्हाळगाव येथील माझ्या ऊसाच्या शेतीची पाहणी केली. यावरुन माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा होणं हे संयुक्तिक नाही, असं देशमुख म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, मला जरी काँग्रेस पक्षातून निलंबित केलेले असले तरी काँग्रेसच्या हिताची भूमिका मी घेत आहे, शिस्तपालन समिती आणि वरिष्ठांना माझी भूमिका मी समजावून सांगणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच येत नाही.

आशिष देशमुख राष्ट्रवादीच्या वाटेवर? काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा, विधानसभा निवडणुकीचं प्लॅनिंग सुरु
देशमुखांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचं एक अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात आशिष देशमुख सहभागी होणार आहेत, अशी माहिती आहे. एवढंच नव्हे तर हिंगणा विधानसभा मतदारसंघात ते मोठी सभा घेणार असल्याचेही वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार नागपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यातच देशमुख यांनी शरद पवारांची आवर्जून भेट घेतली होती. या भेटीनंतरच देशमुखांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबद्दल चर्चांना सुरुवात झाली.

देशमुखांचं काँग्रेसमधून निलंबन

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधामुळे आणि सततच्या गैरवर्तनामुळे काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेत आशिष देशमुख यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यासोबतच त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने त्यांना तीन दिवसांत कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे. तोपर्यंत देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. यावर बोलताना आशिष देशमुख म्हणाले की, मी पक्षाच्या हितासाठी काम करत आहे. मला नोटीस देण्यात आली आहे, हे चुकीचे आहे. पण, पक्षाच्या शिस्तपालन समितीने मला नोटिस दिली आहे, त्याचे उत्तर मी शिस्तपालन समितीला वेळेपूर्वी पाठवीन”.

“नागपुरातील वज्रमुठ सभेनंतर लगेचच राहुल गांधींची दुसरी सभा होत आहे. पक्षाचे हे कारस्थान सुरू आहे. त्यांनी जेव्हा घाईघाईने विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिले तेव्हापासून हे कारस्थान सुरू झाले. मी उत्तरात त्याबद्दल स्पष्टीकरण देईन. नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ते संशयास्पद होते.”

इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच येत नाही

नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे, जर नोटीस द्यायची आहे तर ती नाना पटोले यांना द्यावी, असं देशमुख म्हणाले. मी काँग्रेसच्या हिताची भूमिका घेत आहे, शिस्तपालन समिती आणि वरिष्ठांना माझी भूमिका समजावून सांगणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed