बऱ्याच गावचे लोकं १०० कलावंत असणाऱ्या तमाशाला दोन लाख रुपये द्यायला तयार होत नाहीत. चार पोरी आणि पाचवी गौतमी पाटीलला पाच पाच लाख रुपये देतात हे काय आहे. कलेची गौतमी पाटील करु नका, लोककला आहे ती लोककला राहिलीच पाहिजे. लोककला जपली पाहिजे, असं रघुवीर खेडकर म्हणाले.
पालकांना कानपिचक्या
मुलं कोणत्या वळणाला चालले आहेत, पालकांचं लक्ष कुठं आहे, असा सवाल रघुवीर खेडकर यांनी केला. मुलगा कुणाच्या कार्यक्रमाला चाललाय ते विचारत का नाही. मुलांना हरिपाठ पाठ नाही, गौतमी पाटीलची गाणी पाठ आहेत, हे काय चाललंय, असा सवाल रघुवीर खेडकर यांनी केला.
तमाशाला आजपर्यंत नावं ठेवली गेली. मी तमाशात गेल्या ५० वर्षांपासून काम करतोय. या मुलींना पाहायला तुम्ही मारामारी करता. महाराष्ट्रात काय चाललंय काय, असा सवाल रघुवीर खेडकर यांनी केला. महाराष्ट्रातील राजकारण्याचं देखील याकडे लक्ष नाही. सर्वांनी याकडे लक्ष दिलं नाही राज्याची चुकीच्या दिशेनं वाटचाल होईल, असं रघुवीर खेडकर म्हणाले.
गौतमी पाटीलच्या मानधनाची चर्चा सुरुच
कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी गौतमी पाटीलचं नाव न घेता तीन गाण्यांना तीन लाख रुपये देतात आणि आमच्या कीर्तनासाठी पाच हजार रुपये जास्त दिली तर चर्चा केली जाते, असं म्हटलं होतं. गौतमी पाटीलनं यावर प्रतिक्रिया देताना निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची चाहती असून कार्यक्रमासाठी तीन गाण्यांसाठी तीन लाख रुपये घेत नसल्याचं सांगितलं होतं. आता रघुवीर खेडकर यांनी देखील मानधनाच्या मुद्यावरुन गौतमी पाटीलवर थेट टीका न करता महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न विचारला आहे.