अवयवदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आयोजित अवयवदान जनजागृती अभियानाला अंबादास दानवे यांनी भेट दिली. यावेळी अवयवदानाचे महत्व विषद करत या चळवळीत मोठया प्रमाणात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. अंबादास दानवे यांनी देखील यावेळी देहदान करण्याची घोषणा केली.
अंबादास दानवे यांची घोषणा, टाळ्यांचा कडकडाट
अवयदानाच्या जनजागृतीच्या कामात आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असं अंबादास दानवे म्हणाले. यावेळी संबोधित करत असताना त्यांनी मोठी घोषणा केली. ज्या वेळी गरज पडेल, या जगात नसेन त्यावेळी संपर्ण देहाचं दान करण्याची घोषणा अंबादास दानवे यांनी केली. अंबादास दानवे यांनी देहदानाची घोषणा करतात उपस्थितांसह मंचावर बसलेल्या सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
भर सभेत अंबादास दानवेंचं देहदान करण्याची घोषणा; सर्वांकडून कौतुक
आरोग्याचा प्रश्न, सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर
वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अवयवदानाबद्दल जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. महाजन यांच्यासह भाजपचे मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे आणि खासदार इम्तियाज जलील हे सर्वजण अवयदान जनजागृती अभियानाच्या शुभारंभानिमित्त एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. या नेत्यांमध्ये कार्यक्रमामध्ये चर्चा सुरु होती. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजकीय भूमिका वेगळ्या असल्यातरी आरोग्याचा मुद्दा असेल किंवा चांगल्या कामाच्या सुरुवातीला राजकीय नेत्यांसारखं कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं समोर आले.