• Mon. Nov 25th, 2024

    श्री क्षेत्र जोतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासनकाठीचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून पूजन

    ByMH LIVE NEWS

    Apr 5, 2023
    श्री क्षेत्र जोतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासनकाठीचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून पूजन

    कोल्हापूर, दि. १६ (जिमाका) : जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी श्री जोतिबाचे सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासन काठी क्र.  १ या मानाच्या सासन काठीचे पुजन करण्यात आले.

    यावेळी त्यांच्यासमवेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, शाहुवाडी-पन्हाळा प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे उपस्थित होते.

    “जोतिबाच्या नावानं चांगभल…!” च्या जयघोषात महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, गोवा, कर्नाटक आदी राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेत उंच सासन काठ्या नाचवत देहभान विसरुन सहभागी झाले आहेत. या सर्व भाविकांना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी जोतिबा यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या. पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजा पार पडल्यानंतर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही श्री जोतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासन काठ्यांचे पूजन केले.

    पालकमंत्र्यांकडून वैद्यकीय सेवा व प्रथमोपचार केंद्राची पाहणी-

    रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांच्यावतीने आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल व केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने जोतिबा मंदिरात भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा व प्रथमोपचार केंद्राचे दालन सतत 24 तास कार्यरत ठेवले असून या केंद्राची पाहणी पालकमंत्री दीपक केसरकर व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

    क्षणचित्रे-

    1) श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त लाखो भाविकांची उपस्थिती, तर देवस्थान समितीकडून यात्रेचे नीटनेटके नियोजन व स्वच्छतेबाबत योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे.

    2) पालकमंत्र्यांकडून मानाच्या सासनकाठीचे पूजन

    3) देवस्थान समितीकडून मानाचा फेटा घालून पालकमंत्र्याचा  तसेच अन्य मान्यवरांचा सन्मान

    4)  पायथा ते मंदिरापर्यंत केएमटीची भाविकांसाठी मोफत बस सेवा

    5) यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

    6)  स्वयंसेवी संस्थांकडून भाविकांसाठी ठिकठिकाणी प्रसादाचे तसेच पिण्याच्या पाण्याचे मोफत नियोजन

    7) जोतिबाच्या नावानं चांगभल…! चा सातत्याने भाविकांकडून जयघोष, भाविकांमध्ये अपूर्व उत्साहाची

         लाट…..कडक उन्हातही भाविकांचा उत्साह कायम

    8) रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांच्यावतीने आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल व केमिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा व प्रथमोपचार केंद्र निर्माण करून सतत 24 तास खुले ठेवण्यात आले आहे.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *