ज्या संभाजीनगर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना सहापैकी पाच आमदारांनी दणका दिला, जिथे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं, त्याच संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची सभा पार पडतीये. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे महत्त्वाचे नेते सभेला उपस्थित आहेत. चंद्रकांत खैरे, धनंजय मुंडे, अजित पवार, अशोक चव्हाण यांची भाषणं झाल्यानंतर अजित पवार बोलायला उभे राहिले. त्यांनी पीकविमा, अवकाळी, कांदाप्रश्न, मराठवाडा मुक्ती संग्राम, गौरव यात्रा अशा मुद्द्यांवरुन जोरदार फटकेबाजी करुन भाजपला लक्ष्य केलं.
अजितदादा ऑन फायर मोड, मविआ नेत्यांच्या चेहऱ्यावर हसू
आम्हाला सगळ्याच महापुरुषांचा आदर आहे. पण ज्यावेळी शिवराय, महात्मा फुल्यांचा अवमान झाला त्यावेळी आज गौरव यात्रा काढणारे नेते का बोलले नाहीत. तेव्हा मूग गिळले होते की दातखिळ बसली होती? गौरव यात्रेला आमचा विरोध नाही पण दुपट्टी राजकारणाला आमचा विरोध आहे. सावरकरांच्या बाबतीत जे झालं त्यानंतर आम्ही वातावरण शांत केलं. पण भाजपकडून केवळ राजकारण केलं जातंय. भडकाऊ भाषणं केल जातायेत. सरकारच्या कारभारावरुन सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. कोर्ट म्हणतंय शक्तीहीन सरकार, नपुंसक सरकार…. असं अजितदादा म्हणताच उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. अजितदादांचा फायर मोड पाहून मंचावरील नेतेही खळखळून हसले.
हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करतंय का?
आताच अधिवेशन संपन्न झालं. आम्ही प्रत्येक वंचित घटकांचा आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सभागृहात आवाज उठवला. अवकाळी, पीक विमा, कांद्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारशी संघर्ष केला. पण हे सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे नमलं नाही. हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करतंय का? असा सवाल अजितदादांनी विचारला.