छत्रपती संभाजीनगरमधून मविआच्या एकीची वज्रमूठ
महाविकास आघाडीकडून राज्यभरात विविध ठिकाणी वज्रमूठ सभांचं आयोजन करण्यात येणार आहे. २०१९ मध्ये मविआचा प्रयोग सुरु करण्यात आला होता. जून २०२२ मध्ये सत्ता गेल्यानंतरही मविआ एकत्र राहिली आहे. मविआच्या नेत्यांची एकजूट कार्यकर्त्यांपर्यंत जावी, आगामी महापालिका आणि नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मविआच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न आजच्या सभेतून करण्यात येईल. या सभेसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते जमणार आहेत.
शिवसेना नाव आणि चिन्ह गमावूनही ठाकरेंचं नेतृत्व
महाविकास आघाडीच्या सरकारचं मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता विधानसभेचे १६ आमदार, विधानपरिषदेतील ११ आमदार आणि लोकसभेचे ६ आणि राज्यसभेतील खासदार आहेत. मविआतील घटक पक्षाच्या विधानसभेतील संख्याबळाचा विचार केला तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५३, काँग्रेसकडे ४५ आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे १६ आमदार आहेत. तरीदेखील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात वज्रमुठ सभांचं आयोजन केलं आहे. आजच्या सभेला देखील उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती
करोना संसर्गाच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामामुळं त्यांच्याबद्दल राज्यातील जनतेच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण झाली होती. उद्धव ठाकरे यांना ज्या प्रमाणं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं त्यामुळं त्यांच्याबद्दल राज्यात सहानूभूती निर्माण झाली होती. ठाकरेंच्या हातून चिन्ह जाणं, पक्ष जाणं यामुळं त्यांच्याबद्दल सहानुभूती कायम आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात वाटचाल सुरु ठेवल्यास मविआला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा
उद्धव ठाकरे यांनी जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतली होती. या सभेनंतर काही दिवसांमध्येच पक्ष फुटला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. उद्धव ठाकरे आजच्या सभेच्या निमित्तानं मराठवाड्यातील शिवसैनिकांशी संवाद साधतील. छत्रपती संभाजीनगरमधील सेनेचे आमदार अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ, संदिपान भूमरे, रमेश बोरनारे आणि प्रदीप जैस्वाल हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे या आमदारांवर देखील काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.
मविआची एकीची वज्रमूठ
महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर तिन्ही पक्षांचं सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे लक्ष होतं. मात्र, महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी जनतेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मविआचा प्रयोग हा केवळ सत्तेसाठी केलेला नव्हता तर महाराष्ट्राच्या हितासाठी होता हे विरोधात बसूनही एकत्र आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न मविआतील घटकपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, एका वर्षांनी होणाऱ्या लोकसभा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्त्वाची ठरणार आहे. मविआचे नेते आजच्या सभेतून तिन्ही पक्षांची एकीची वज्रमूठ दाखवून देण्याच्या तयारीत आहेत.