मुंबई, दि. ६: मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे दुबईसह संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या समन्वयाने ही संपूर्ण प्रक्रिया राबविली जात असून, शासन, भारताचे दुबई येथील वाणिज्य दूतावास तसेच स्थानिक स्वयंसेवी टीम यांच्यात सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. आयपीएफ महा हेल्पलाईन सक्रिय करण्यात आली असून तिच्यामार्फत आतापर्यंत हजाराहून अधिक अडकलेल्या प्रवाशांशी संपर्क साधण्यात आला आहे. स्वयंसेवकांची टीम दुबईसह यूएईतील विविध शहरांमध्ये २४ तास कार्यरत राहून नागरिकांना निवास, औषधे, अन्न, वाहतूक आणि आवश्यक समन्वयाची मदत करत आहे. उपलब्ध फ्लाइट्सद्वारे शेकडो नागरिकांना परतीचा मार्गही मिळवून देण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन यांनी दुबई येथील भारताचे वाणिज्य दुतावास यांच्याशी थेट संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला असून, महाराष्ट्रातील नागरिकांना प्राधान्याने फ्लाइट्समध्ये जागा मिळावी यासाठी विनंती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या प्रवाशांची यादी संकलित करून ती दूतावासामार्फत विमान कंपन्यांना देण्यात आली आहे, जेणेकरून उपलब्ध फ्लाइट्समध्ये त्यांना प्राधान्य देता येईल. सध्या काही हवाई मार्गांवरील निर्बंध आणि स्थानिक एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) कडून पूर्ण क्षमतेने परवानगी न मिळाल्यामुळे फ्लाइट्सची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे प्रवाशांना त्वरित मोठ्या प्रमाणावर परत पाठवणे आव्हानात्मक ठरत असले तरी परिस्थिती हळूहळू सुधारत असून पुढील काही दिवसांत फ्लाइट्सची संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, उद्या फ्लाय दुबई च्या फ्लाइटद्वारे महा हेल्पलाईनच्या समन्वयातून २० प्रवाशांसाठी विशेषतः राखीव ठेवलेल्या जागांद्वारे महाराष्ट्रातील नागरिकांना भारतात परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रवाशांची निवड प्राधान्याने अडकलेल्या आणि तातडीच्या गरज असलेल्या नागरिकांमधून करण्यात आली आहे. यातून 4 मार्च रोजी 20 व 5 मार्च रोजी 30 प्रवासी महाराष्ट्रामध्ये परतले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व अडकलेल्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, घाबरून जाऊ नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. शासन, भारत सरकारचे दूतावास आणि स्थानिक स्वयंसेवक यांच्यात समन्वय सुरू असून प्रत्येक नागरिकाला सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
‘सहायता’ पोर्टलवर अथवा https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ या लिंकवर जाऊन संबंधित नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक माहिती भरावी, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले आहे. या माध्यमातून शासनाला अडकलेल्या व्यक्तींचे स्थान, संपर्क क्रमांक, प्रवासाचा तपशील इत्यादी माहिती तात्काळ उपलब्ध होणार असून मदतकार्य अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होईल.
अडकलेल्या नागरिकांनी आवश्यक माहिती नोंदवण्यासाठी आणि मदतीसाठी महा हेल्पलाईन शी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, उपलब्ध प्रत्येक फ्लाइटमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
०००
किरण वाघ/विसंअ
