• Sat. Sep 21st, 2024

रेशीम शेतीने गणपत मदने यांच्या जीवनाला कलाटणी

ByMH LIVE NEWS

Apr 2, 2023
रेशीम शेतीने गणपत मदने यांच्या जीवनाला कलाटणी

पारंपरिक पद्धतीने शेती करताना ओढाताण होणारे कुटुंबीय… ते आज रेशीम शेतीच्या आधारावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण पूर्ण… माळशिरस तालुक्यातील गणपत मदने यांच्या जीवनाला रेशीम शेतीने खऱ्या आणि चांगल्या अर्थाने कलाटणी दिली आहे. माळशिरस तालुक्यातील साळमुखवाडी हे गणपत महादेव मदने यांचे गाव. त्यांची 7 एकर शेती आहे. त्यातील 3 एकर क्षेत्रावर रेशीम शेती ते करतात.

गणपत मदने पूर्वी पारंपरिक पद्धतीने ऊस, मका, ज्वारी ही पिके घेत. पण खर्च वजा जाता हातात काही मिळत नव्हतं. विशेष म्हणजे ऊस पिकासाठी येणारा खर्च, मिळणारे उत्पन्न आणि लागणारा कालावधी यांचा ताळमेळ बसत नसल्याने त्यांची खूप ओढाताण व्हायची. त्यांनी दूध व्यवसायही करून पाहिला. त्यांना ४ मुली व एक मुलगा. घरखर्च भागत नसल्याने घरची मंडळी शेजारी रोजंदारीने कामावर जात होती. स्पर्धेच्या युगात मुलांच्या शिक्षणाची व भविष्याची चिंता त्यांना सतावत असे.

अशा परिस्थितीत शेजारच्या सुरवसे भाऊसाहेबांनी केलेल्या रेशीमशेतीने श्री. मदने यांच्याही मनात आशेची पालवी फुटली. त्यांनी 2017 साली तुती लागवड करून रेशीम व्यवसायाचा श्रीगणेशा केला. पहिल्या वर्षी नफा कमी झाला. पण, मिळालेला अनुभव, शास्त्रोक्त मार्गदर्शन व त्रुटींची पूर्तता करत दुसऱ्या वर्षीपासून श्री. मदने यांनी प्रगतीकडे वाटचाल सुरू केली.

याबाबत गणपत मदने म्हणाले, मी 2017 ला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एक एकर क्षेत्रावर तुती लागवड करून रेशीम व्यवसायाची सुरूवात केली. पहिल्या वर्षी विशेष अनुभव नसल्याने आणि लागणारी औषधी, साहित्य सहज मिळत नसल्यामुळे फार कमी नफा झाला. पण दुसऱ्या वर्षी आजुबाजूच्या अनेक शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यास सुरवात केली होती. रेशीम कोष वाहतुकीसाठी सुरवसे भाऊसाहेब यांनी टेम्पो घेऊन कोष विक्री करण्याकरिता कर्नाटकातील रामनगर गाठले आणि खऱ्या अर्थाने आमच्या रेशीम उद्योगाला रंगत येऊ लागली.

गणपत मदने यांना रेशीम अधिकारी आणि समूह प्रमुख यांच्याकडून वेळोवेळी शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळत गेले. त्यांच्याच एका नातेवाईकाने रेशीम उद्योगास लागणारी औषधे आणि साहित्य याचे दुकान सुरू केले. त्यामुळे पंचक्रोशीतल्या सर्व शेतकऱ्यांची अडचण दूर झाली.

याबाबत गणपत मदने म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लागवड केल्याने घरच्या शेतात काम करून प्रत्येक आठवड्याला मजुरी, साहित्य खरेदीसाठी अनुदान आणि रेशीम संगोपन गृह यासाठी मला जवळपास पावणेतीन लाख रूपये मिळाले. रामनगरला कोष विक्री केल्याने दरपण चांगला मिळाला. प्रत्येक चिकातून एकरी 50 ते 60 हजार रूपये मिळत होते. अगदी कोरोनाच्या मंदीच्या काळात जगाचे व्यवहार ठप्प झाले असताना मी रेशीम शेतीमधून नफा मिळवला आहे. फेब्रुवारी 2023 अखेर गेल्या वर्षभरात मी साधारण 1500 अंडीपुंजाचे संगोपन घेतले आहे आणि त्यापासून मला आजअखेर 6 लाख रुपये नफा मिळाला.

गणपत मदने यांचे दर तीन महिन्याला दोन लॉट विक्रीसाठी जातात. हे कोष सातारा जिल्हा, आत्मा, सोलापूर आणि रामनगर (कर्नाटक) येथे विक्रीसाठी जातात. काही कंपन्या शेतावरही येऊन प्रत्यक्ष खरेदी करतात. जूनमध्ये दोन एकर क्षेत्रावर रेशीम शेती वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

गणपत मदने यांनी रेशीम शेतीच्या आधारावर मोठ्या मुलीचे लग्न, दोन मुलींचे डी. फार्म आणि एका मुलीचे एम. एस्सी (मॅथ्स) चे शिक्षण दिले. ती आज बँकेत नोकरी करत आहे. तसेच त्यांचा मुलगा बीसीएस अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. आता त्यांच्या घरचे मंडळी रोजंदारीवर जात नाहीत. याउलट चार ते पाच शेतमजूर त्यांच्या शेतात राबत आहेत. या सुखाच्या दिवसाला एकमेव कारण फक्त रेशीम शेती आहे, असे गणपत मदने अभिमानाने सांगतात. रेशीम शेतीमुळे त्यांच्या घरात सुख समृद्धी आली आहे.

संप्रदा बीडकर

जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed