ख्रिश्चनांविरोधातील हिंसाचार थांबवा
समस्त ख्रिश्चन समाजाच्यावतीनं शांततापूर्ण निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. “आता नाही तर कधीच नाही” ही टॅगलाईन घेऊन ही रॅली पार पडणार आहे. या साठी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील प्रोटेस्टंट ख्रिश्चन आणि रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन समुदायाच्यावतीनं शांततापूर्ण मार्गानं निषेध रॅली १२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीच्या माध्यमातून देशातील २.६ ख्रिश्चन समुदायानं राष्ट्रउभारणीत योगदान दिलं असून शैक्षणिक संस्था, रुग्णालय, धर्मादाय संस्थाच्या द्वारे इतर समाजासाठी देखील काम केल्याचं समस्त ख्रिस्ती समाजातर्फे सांगण्यात आलं.
ख्रिश्चन समुदायाविरोधात राबवल्या जाणाऱ्या द्वेषपूर्ण मोहिमा थांबवण्यात याव्यात,राजकीय नेत्यांची ख्रिश्चन समुदायाविरोधातील द्वेषपूर्ण भाषण थांबवली जावीत. सध्याच्या कायद्यात पुरेशा तरतुदी असताना धर्मांतर विरोधी कायदा राबवला जाऊ नये. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ख्रिश्चन दफनभूमी असावी,मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये दफनभूमी असावी. ठाण्यातील दफनभूमीसाठी आरक्षित करण्यात आलेल्या प्लॉट देण्यात यावेत. ४० आयोगांमध्ये ख्रिश्चन समुदाला प्रतिनिधीत्व मिळावं, अशा मागण्या समस्त ख्रिस्ती समाजाच्यावतीनं करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मुंबईतील वीर जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत ख्रिश्चन समाजातर्फे शांततापूर्ण मार्गानं निषेध रॅली १२ एप्रिल रोजी दुपारी १ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान काढण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यातील विविध भागातील ख्रिश्चन समुदायाच्या नागरिकांनी उपस्थित राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.