काय होतं प्रकरण?
पवन मधुकर काळे (वय ३५, रा खड़की, अकोला) यांचा २४ फेब्रुवारी रोजी खदान पोलीस स्टेशन हद्दीतील खडकी परिसरात राहत्या घरी मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले होते. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, ६ मार्चला मृताचे (पवनचा) शवविच्छेदनाचा म्हणजेच वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. त्यात युवकाचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याचे नमूद करण्यात आले होते. म्हणजेच तोंड आणि नाक जास्त वेळ दाबून ठेवल्याने मृत्यू झाल्याचं समजलं. त्यामुळे खदान पोलिसांनी खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पवनच्या खुनाचा तपास सुरू झाला, तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक बाब समोर आली.
चक्क पवनचा मोठा भाऊ आणि आई-वडिलांनी मिळून त्याची हत्या केल्याचं उघड झालं. अखेर हत्या प्रकरणी आई-वडील आणि भावाला पोलिसांनी अटक केली असून तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ एप्रिलपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान वडील मधुकर आनंदराव काळे (वय, ३ परिवहन महामंडळ वर्कशॉप सेवानिवृत्त), आई चंदाबाई मधुकर काळे (वय ५५) आणि मोठा भाऊ मनोज मधुकर काळे (वय ३९) असे या पवनचे मारेकरी तिघांची नावे आहेत.
सुरुवातीला केला आकस्मित मृत्यूचा बनाव…
पवनचा मृतदेहाचा वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी खुनाच्या दिशेने तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी आई-वडिलांची चौकशी केली. त्यावेळी आई-वडिलांनी सांगितलं होतं ‘पवन’नं दुपारी बारा वाजता (२४ फेब्रुवारी रोजी) अंघोळ केली. अन् झोपला. त्याला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला असता ‘तो’ उठलाच नाही. त्यात आपल्या मुलाला दारुचं प्रचंड व्यसन होतं. त्यामुळे दारु प्यायल्याने अचानक बेशुद्ध पडला असावा, म्हणून लागलीच त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. इथे डॉक्टरांनी आम्हाला पवन मरण पावला असल्याचं सांगितले.
असा झाला खुनाचा गुन्हा उघड
२४ फेब्रुवारीला दुपारी आई-वडिलांसह भावाने मृत पवनला उपचारासाठी दाखल केलं होतं. त्याच दिवशी पवनच्या मृतदेहावर रात्री ८ वाजता वैद्यकीय चाचणी पार पडली. काही दिवसानंतर वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला, आणि या अहवालात धक्कादायक बाब उघड झाली होती. ती म्हणजे पवनचा गुदमरून मृत्यू झाल्याची. त्यात पवनचा मृत्यू रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी पाच ते सात तासांपूर्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांना त्याच्या आई-वडिलांवर संशय आला, कारण त्यांनी म्हटल्यानुसार पवनने दुपारी बारा वाजता आंघोळ केली होती, परंतु इथे डॉक्टरांनी सांगितले की त्याचा अगोदर मृत्यु झालेला होता. पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असता आई-वडील आणि मोठा भाऊ याने एकत्रित हत्या केल्याचं समोर आलं. पवन गाढ झोपेत असताना त्याची उशीने तोंड दाबून या तिघांनी हत्या केल्याचं सांगितलं. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय महादेव पडघन आणि पोलीस कर्मचारी शंकर डाबेराव यांनी केला आहे.
त्याच्या त्रासाला कंटाळून उचललं पाऊल…
मधुकर काळे यांना तीन मुलं आहेत. मनोज, पवन आणि सर्वात लहान भाऊ विनोद असे तिघांची नावे आहेत. दरम्यान पवन हा विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. तसेच पवनला दारूचं व्यसन असल्याने सतत पती-पत्नीमध्ये वाद व्हायचा. गेल्या नऊ महिन्यांपासून पवनची पत्नी माहेरी राहत आहे.
तसेच दारूमुळे आई-वडिलांसोबतही त्याचा वाद व्हायचा. त्याच्या व्यसनाचा आई-वडिलांना प्रचंड त्रास होता. याच त्रासामुळे आई-वडिलांसह मोठा भाऊ मनोज याने पवनच्या हत्येचा कट रचला. हत्येच्या दिवशी लहान भाऊ बाहेर गेलेला होता. त्यात पत्नी आणि मुलं अनेक दिवसांपासून माहेरी आहेत. याच संधीचा फायदा घेत तिघांनी पवनचा काटा काढला.