सुप्यात बाजार मैदानालगत सुयश सुनील जाधव यांचे महालक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान आहे. दरोडेखोरांनी ते लुटण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ मदतीला येत असल्याचे पाहून दुकानात गोळीबार करण्यात आला. दरोडेखोर पळून जात असताना ग्रामस्थांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा गोळीबार केला गेला. यात सागर हे जखमी झाले. दुसऱ्या गोळ्या अशोक बोरकर व सुशांत क्षीरसागर यांच्या पोटाला व पायाला लागल्या.
क्षीरसागर हे दुकानातील कामगार आहेत. दुकान मालक जाधव यांची पत्नीही यावेळी दुकानात उपस्थित होती. त्यांना या घटनेने मोठा धक्का बसला. त्यामुळे या घटनेत नेमकी कितीची लूट झाली याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध झाली नाही.
जखमींना उपचारार्थ येथील साळुंके हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यावेळी एक दरोडेखोर ग्रामस्थांच्या हाती लागताच अन्य लोक मोटारीतून पसार झाले.
खेडमध्ये महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार, पण स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी गालबोट!
सुप्यात शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून पसार झालेल्यांच्या शोधार्थ पथके पाठविण्यात आली आहेत. घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी तात्काळ भेट दिली.