भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यू ची वाट पाहत होते का ? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू दयाची होती.त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत भावी खासदाचे बॅनर पण लावले.जनाची नाही मनाची तरी ठेवा, असे ट्विट राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांनी केले आहे. याशिवाय, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही जगदीश मुळीक यांना फैलावर घेतले आहे. त्यांनीदेखील ट्विट करुन जगदीश मुळीक यांना खडे बोल सुनावले. १० दिवसांचे सुतक तर संपु द्या मग लावा बॅनर का तुम्ही वाटच बघत होतात आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत .. हाच का तुमचा वेगळे पणा .. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत, तोवरच तुम्ही पॅड घालून तयार, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला अवघे चार दिवस झाले आहेत. तब्बल चार दशकं पुण्याच्या राजकारणावर छाप असणारा नेता गेल्याने संपूर्ण शहर शोकाकुल आहे. मात्र दुसरीकडे पुण्यातील काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठल्याचा पाहायला मिळत आहे. आज पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा वाढदिवस असल्याने त्या निमित्ताने शहरभर बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र कल्याणी नगर भागात लागलेल्या एका बॅनरवर जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सुसंस्कृत राजकारणाचा वारसा असणाऱ्या पुण्याला नक्की झालंय काय ?, असा प्रश्न विचारण्यात येतोय.
अतिक शेख या मुळीक समर्थकाने कल्याणीनगर भागात जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग लावले होते. त्यावर जगदीश मुळीक यांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आला होता. मात्र काही वेळातच हे होर्डिंग्स हटवण्यात आले आहे. गिरीश बापट यांनी चार दशकं पुण्याच्या राजकारण आणि समाजकारणावर आपली छाप सोडली होती. आज अनेक भाजपचे कार्यकर्ते नेते झालेत ते बापट यांच्याच मुशीत घडले आहेत. मात्र असा व्रतस्थ नेता गेल्या नंतर अवघ्या चारचं दिवसांत त्यांच्या जागेवर दावा ठोकल्याने पुणेकर संताप व्यक्त केला जात आहे.
जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द
लोकनेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणारे सर्व कार्यक्रम, उपक्रम रद्द करण्यात आले असल्याचं जगदीश मुळीक यांनी स्पष्ट केले आहे.
गिरीश बापटांना अखेरचा निरोप देताना कार्यकर्त्याच्या अश्रूंचा बांध फुटला