सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्राण प्रणाला लावून काम केले. तसेच भारतातील अनेक संस्थांना एकत्रित आणून भारतीय स्वातंत्र्याला बळकटी आणली. अशा या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, कोल्हापूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. तरी नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, कोल्हापूर यांच्यातर्फे मिरज जंक्शन, फ्लॅटफॉर्म नं 1 येथे एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी महेश चोपडे, स्टेशन मॅनेजर जे. एस. तांदळे, सहायक प्रचार अधिकारी विकास तापकीर, कल्याण निरिक्षक दयानंद कांबळे, आर. पी. एफचे पोलीस निरिक्षक सतवरी सिंग, पी. पी. मराठे हे उपस्थित होते.
प्रदर्शनामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दुर्मिळ छायाचित्रे, एलईडी स्क्रीनवर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनपटांवर आधारित व्हिडीओ क्लिप लावण्यात आले आहेत. तसेच उपजिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत मतदान ओळखपत्रास आधार कार्ड जोडणीसाठीही स्टॉल उभारण्यात आला आहे. याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकता दिवस निमित्त सर्व उपस्थितांना एकात्मतेची शपथ देण्यात आली.