• Mon. Nov 25th, 2024

    ६ नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह

    ByMH LIVE NEWS

    Oct 31, 2022
    ६ नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह

    सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.)–  आज 31 ऑक्टोबर पासून 6 नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवूया. लाच देणे आणि लाच घेणे हे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे. कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी शासकीय कामासाठी लागणाऱ्या शुल्काव्यतिरिक्त पैशाची, वस्तूची मागणी करत असेल तर ती लाच आहे असे समजावे. जर आपल्याकडे कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी अशा प्रकारे लाचेची मागणी करीत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग कार्यालय कुडाळ 1064 या टोल फ्री क्रमांकावर, 02362-222289 वर तसेच 9930997700  या व्हाट्स ॲप क्रमांकावर, पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे -9890079208, www.acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर लेखी तक्रार करा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे यांनी केले आहे.

    शासकीय नोकरांनी लाचेची मागणी, लाच स्वीकारणे, शासकीय नोकरास लाच देणे, अपसंपदा प्राप्त करणे व पदाचा दुरूपयोग करून भ्रष्टाचार करणे, शासकीय नोकराने भ्रष्टाचारामार्फत मोठ्या प्रमाणात स्वत:च्या नावे किंवा त्याच्यावतीने कोणत्याही व्यक्तीकडे, पद धारण करण्याच्या कालावधीत कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब देवू शकणार नाही अशा आर्थिक साधन-संपत्तीचा किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांचा विसंगत प्रमाणात मालमत्ता जमवणे. अशा गुन्ह्याचा तपास एसीबीमार्फत होतो. लोकसेवक किंवा खासगी इसम. जो लोकसेवकाच्यावतीने लाचेची मागणी करेल व स्वीकारेल. ज्या लोकसेवकाकडे तक्रारदाराचे कायदेशीर काम प्रलंबित आहे अशा लोकसेवकाविरुध्द तसेच त्याच्याकडे काम प्रलंबित नसतानाही स्वत:च्या फायद्यासाठी पदाचा दुरूपयोग करणाऱ्या लोकसेवकाविरूध्द तक्रार देता येते.

    सापळा कारवाई म्हणजे, लाचेची मागणी लाच स्वीकारताना व लाच देताना एसीबीमार्फत सरकारी नोकरास रंगेहात पकडणे. सापळा रक्कम तक्रारदाराकडून पुरवली जाते. ही रक्कम त्याला परत मिळते. सरकारी नोकराकडून कायदेशीर काम करण्याकरिता शासकीय फी व्यतिरिक्त इतर तसेच कायदेशीर काम न करण्याकरिता पैशाची अथवा इतर गोष्टींची मागणी होत असेल अशावेळी लाचेची तक्रार देता येते. सापळा कारवाईत तक्रारदाराचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने त्याला एसीबी कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. तक्रारदाराची ओळख तसेच लाचेचा सापळा ही गुप्त ठेवली जाते.

    सापळा कारवाईनंतर आरोपी लोकसेकवकाकडून तक्रारदारास धमकी प्राप्त झाल्यास एसीबीमार्फत आरोपीविरूध्द पुरावे जमा करून त्याचा जामिन रद्द होण्याकरिता न्यायालयास विनंती केली जाते. तक्रार 1064 या टोल फ्री क्रमांकाव्दारे www.acbmaharashtra.gov.in  Anti-Corruption Bureau Maharashtra या फेसबुक पेजवरील lodge व कंप्लेंट सदराखाली करता येते. लेखी अर्ज तसेच लाचेची तक्रार देण्याकरिता तक्रारदाराने स्वत: एसीबी कार्यालयात हजर राहणे गरजेचे आहे. सापळा कारवाईनंतर तक्रारदाराचे प्रलंबित काम एसीबीमार्फत पूर्ण होण्याकरिता पाठपुरावा केला जातो. न्यायालयीन प्रकियेदरम्यान साक्षीकामी हजर राहणे तक्रारदाराला आवश्यक असते.

    लोकसेवकाने घटनास्थळीच लाचेची मागणी केली किंवा लाच स्वीकारली अशा वेळी अशा लाचेच्या घटनांच्या माहितीबाबत मोबाईल, कॅमेरामध्ये, ऑडीओ-व्हिडीओ टिपून तो एसीबीच्या www.acbmaharashtra.net या मोबाईल ॲपवरील कंप्लेंट पॅनलमधून पोस्ट करावी.

    चला तर मग करूया लाच घेणाऱ्या लोकसेवकांची तक्रार आणि संपवूया भ्रष्टाचार. त्यासाठी लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग, पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे टोल फ्री क्रमांक 1064, 02362-222289, पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे-9890079208, पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील- 8369960851, पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला- 8805267878 तसेच 9930997700  या व्हाटस ॲप क्रमांकावर संपर्क साधावा.

                                                                                       – प्रशांत सातपुते                 

                                                                                     जिल्हा माहिती अधिकारी,

                                                                                                सिंधुदुर्ग

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed