• Fri. Sep 11th, 2026

देवदरीसह पुनर्वसित गावांतील नागरी सुविधांची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा – मंत्री मकरंद जाधव-पाटील – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 10, 2026

बुलढाणा, दि. १० : पेनटाकळी सिंचन प्रकल्पामुळे बाधित व पुनर्वसित गावांमधील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून नागरी सुविधांची कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. कामांमध्ये दिरंगाई अथवा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव- पाटील यांनी दिले.

विदर्भ पाटबंधारे विकास मंडळ व जलसंपदा विभागांतर्गत पेनटाकळी प्रकल्पांबाबत मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत सिंचन प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या तसेच पुनर्वसित गावांतील विविध प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार श्वेता महाले,बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

पेनटाकळी प्रकल्पांतर्गत मौजे देवदरी (ता. चिखली, जि. बुलढाणा) गावाच्या पुनर्वसन प्रस्तावास मंजुरी देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. पुनर्वसनाशी संबंधित प्रलंबित बाबींची कार्यवाही गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पेनटाकळी प्रकल्पांतर्गत मौजे घानमोड, मानमोड व पांढरदेव (ता. चिखली) या पुनर्वसित गावांमध्ये सुरू असलेल्या नागरी सुविधांच्या कामांचा बैठकीत विशेष आढावा घेण्यात आला. या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून कामांमध्ये विलंब होत असल्याबाबत पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

नागरी सुविधांची कामे ही पुनर्वसित नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित असल्याने त्यामध्ये कोणतीही तडजोड करू नये. संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा दर्जा तपासावा तसेच प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले. पुनर्वसनाच्या कामांमध्ये दिरंगाई, हलगर्जीपणा किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.

बैठकीस जलसंपदा विभाग, अमरावती, बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ तसेच खडकपूर्णा प्रकल्प विभाग,मुख्य अभियंता जलसंपदा, अमरावती, अधीक्षक अभियंता बुलढाणा देऊळगाव राजा येथील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

संध्या गरवारे/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed