• Thu. Sep 10th, 2026

Kolhapur News : 15 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू झाल्यास पेटणार संघर्ष; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकारने 15 ऑक्टोबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याला राजू शेट्टी यांनी विरोध केला आहे. 15 ऑक्टोबला एकही कारखाना सुरु होऊ देणार नसल्याची भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोल्हापूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करत चालू वर्षाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितावर गदा येणार असल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर सरकारने शेतकऱ्यांना प्रतिटन 500 रुपये अनुदान जाहीर केले नाही, तर 15 ऑक्टोबरला एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा शेट्टी यांनी दिला आहे. यामुळे आगामी काळात राज्यात टोकाचा संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

रिकव्हरीतील घटीमुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका

राजू शेट्टी यांनी या निर्णयामागील तांत्रिक आणि आर्थिक तोटे सविस्तरपणे मांडले आहेत. त्यांच्या मते, 15 ऑक्टोबरसारख्या लवकरच्या तारखेला साखर कारखाने सुरू केल्यास उसाच्या रिकव्हरीवर मोठा परिणाम होतो. पहिल्या एका महिन्यात उसाची रिकव्हरी जवळपास 1.25 टक्क्यांनी कमी भरते. रिकव्हरी कमी होणे म्हणजे साखरेचे उत्पादन कमी होणे आणि याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उसाच्या दरावर होतो.

Maharashtra TimesGokul Election : ‘गोकुळ’च्या रणसंग्रामाचे बिगुल वाजले, 18 ऑक्टोबरला मतदान, तर 19 ऑक्टोबरला होणार मतमोजणीया सव्वा टक्क्यांच्या घटीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रतिटन 350 ते 400 रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. इतकेच नाही तर, वर्षाची सरासरी रिकव्हरी खाली आल्यामुळे पुढील वर्षाच्या एफआरपीवर याचे गंभीर परिणाम होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

साखरेच्या तुटवड्याचा बनाव आणि व्यापाऱ्यांचे संगनमत

देशात साखरेचा साठा अपुरा असल्याचा बहाणा करून केंद्र सरकारने हा घाईघाईचा निर्णय घेतल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. मुळात काही मोजक्या साखर कारखानदारांनी आणि व्यापाऱ्यांनी सरकारला चुकीची आकडेवारी देऊन दिशाभूल केली आहे. शेट्टी यांच्या दाव्यानुसार, आगामी नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशाला पुरेल इतका साखर साठा शिल्लक आहे. केंद्र सरकार मोठ्या साठेबाजांवर किंवा कारखानदारांवर धाडी टाकण्याचे धाडस करत नाही, मात्र स्वीट मार्ट आणि छोट्या व्यापाऱ्यांना नाहक त्रास देऊन ‘डोंगर पोखरून उंदीर’ शोधण्याचा प्रकार करत असल्याची टीका त्यांनी केली.

Maharashtra TimesAmruta Fadnavis : ‘मंत्र्यांची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते’, अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या?

आयात धोरण आणि सरकारी अनुदानाची मागणी

साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने आयात शुल्कात 20 टक्क्यांची कपात करून क्विंटलमागे 1,000 रुपयांचा महसूल बुडवला आहे. सध्या आयात केलेली साखर 5,500 रुपये प्रति क्विंटल दराने पडते, तर देशांतर्गत साखरेचे टेंडर 4,800 ते 5,000 रुपयांच्या आसपास आहे. जर सरकार आयातीसाठी तोटा सोसू शकते, तर मग रिकव्हरी कमी झाल्यामुळे नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्याला थेट 500 रुपये अनुदान देण्यास काय हरकत आहे? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

Maharashtra TimesNashik News : दोन दिवसांपूर्वी नाशिक पालिका आयुक्तांचं खड्ड्यांवरुन चॅलेंज अन् दुसरीकडे इंदिरानगरमध्ये मुख्य रस्त्याला मोठं भगदाड

उत्पादनात 20 लाख टनांची घट होण्याची शक्यता

जबरदस्तीने 15 ऑक्टोबरला कारखाने सुरू केल्यास यावर्षी देशाच्या एकूण साखर उत्पादनात किमान 20 लाख टनांची घट होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे केंद्र किंवा राज्य सरकारने 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत गाळप होणाऱ्या उसासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट 500 रुपये जमा करावेत, तरच आम्ही साखर कारखाने सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करू, अन्यथा राज्यात साखर हंगाम सुरू होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.