• Thu. Sep 10th, 2026

महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवानिमित्त भव्य सांस्कृतिक सोहळा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 9, 2026

नवी दिल्ली, दि. ९: राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात यंदाचा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणा सोबतच महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती, खाद्यपरंपरा आणि वस्त्रपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या विविध कार्यक्रमांनी रंगणार आहे. निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, हा या उत्सवामागील प्रमुख उद्देश आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची महाआरती होणार आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी, १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रींची मिरवणूक, सकाळी ११ वाजता प्राणप्रतिष्ठा, तर सायंकाळी ७ वाजता जुन्या महाराष्ट्र सदनात भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

१५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत संसद मार्गावरील आकाशवाणी रंगभवन येथे भरत जाधव व अन्य कलाकारांचा गाजलेला मराठी नाट्यप्रयोग ‘पुन्हा सही रे सही’ सादर होणार आहे. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता जुन्या महाराष्ट्र सदनात ‘नितीन सरकटे हंसराज’ लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे.

१७ सप्टेंबर रोजी आकाशवाणी रंगभवन येथे वैभव जोशी व संदीप खरे यांचा ‘मराठी चित्रपट गीते’ हा विशेष कार्यक्रम, तर १८ सप्टेंबर रोजी संतोष भांगरे प्रस्तुत ‘महाराष्ट्राची लोककला’ हा कार्यक्रम होणार आहे.

१९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत पूजा व महाप्रसाद आयोजित करण्यात आला असून, सायंकाळी ६.३० वाजता जुन्या महाराष्ट्र सदनात गझल नवाज भीमराव पांचाळे यांचा मराठी गझल कार्यक्रम होईल. २० सप्टेंबर रोजी जनपथ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर येथे वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे, शरयू दाते व अन्य गायकांचा ‘मराठी चित्रपट गीते’ कार्यक्रम रंगणार आहे.

२१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता ‘पाक कलाकृती’ स्पर्धा, तर सायंकाळी ६.३० वाजता साध्वी जेठवानी सादरीकृत ‘भरत नाट्यम’ कार्यक्रम जुन्या महाराष्ट्र सदनात होणार आहे. २२ सप्टेंबर रोजी राजेंद्र क्षीरसागर सादरकर्ते असलेला ‘खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

२३ सप्टेंबर रोजी आकाशवाणी रंगभवन येथे प्रमिला लोदगेकर प्रस्तुत ‘लावणी’ कार्यक्रम, तर २४ सप्टेंबर रोजी जुन्या महाराष्ट्र सदनात मोनिका कपूर प्रस्तुत ‘बॉली बीट्स’ या हिंदी-मराठी गायन व नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवातील खास आकर्षणे

यंदाच्या गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृती, हस्तकला आणि वस्त्रपरंपरेची विशेष झलक पाहायला मिळणार आहे. ‘चव महाराष्ट्राची!’ या उपक्रमांतर्गत पुरणपोळी व उकडीचे मोदक बनविण्याचा लाईव्ह स्टॉल हे खास आकर्षण ठरणार आहे.

‘कौशल्याला सलाम!’ या उपक्रमातून दिव्यांग बांधवांनी प्रेमाने व कौशल्याने साकारलेल्या विविध कलावस्तूंचे प्रदर्शन करण्यात येणार असून, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा संदेश यामधून दिला जाणार आहे.

तसेच ‘महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा अनोखा ठेवा!’ या उपक्रमातून पैठणी, इंदुरी, माहेश्वरी, इरकल साड्या तसेच विविध हस्तमाग वस्तूंची आकर्षक मांडणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘खरेदीची पर्वणी!’ अंतर्गत विविध आकर्षक स्टॉल्स, हस्तकला आणि वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची मेजवानी गणेशभक्त व दिल्लीकरांना अनुभवता येणार आहे.

यामुळे चव, संस्कृती, कला आणि खरेदीचा सुंदर संगम गणेशोत्सवाच्या आनंदात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

भव्य विसर्जन मिरवणुकीने सांगता

गणेशोत्सवाची सांगता २५ सप्टेंबर रोजी होणार असून, दुपारी ३ ते सायंकाळी ७.३० या वेळेत जुन्या महाराष्ट्र सदनातून झांज पथकासह श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.

उत्सवातील सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, १५, १७, १८, २० आणि २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. दिल्लीतील नागरिक, महाराष्ट्रप्रेमी तसेच गणेशभक्तांनी या विविध धार्मिक, सांस्कृतिक, कलात्मक आणि खाद्यपरंपरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी केले आहे.

 

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed