• Thu. Sep 10th, 2026

कुणबी प्रमाणपत्रांसाठी ४० महसूल मंडळांत विशेष शिबिरे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 9, 2026

१० ते १७ सप्टेंबरदरम्यान आयोजन; १३ हजार ७१३ अर्जांपैकी १३ हजार ७०७ मंजूर

हिंगोली, दि. ९: कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांची कार्यवाही गतिमान करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व ४० महसूल मंडळांत १० ते १७ सप्टेंबर २०२६ दरम्यान विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे व उपलब्ध पुराव्यांसह संबंधित महसूल मंडळातील शिबिरात उपस्थित राहून अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या विशेष शिबिरांमध्ये जुन्या महसूल नोंदी व अन्य पुरावे शोधणे, प्राप्त अर्ज व कागदपत्रांची तातडीने पडताळणी करणे आणि पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी समन्वय साधून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी कार्यवाही करणार आहेत.

४ हजार ५९९ नोंदी प्रसिद्ध

जिल्ह्यात आढळून आलेल्या कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा अशा ४ हजार ५९९ नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ८ जानेवारी २०२४ रोजी गावनिहाय नोंदी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच १७ व १८ जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे घेऊन या नोंदी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

१० सप्टेंबर २०२५ रोजीही नोंदी प्रसिद्ध करण्यात आल्या असून, ८ सप्टेंबर २०२६ पासून ग्रामपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवर नोंदी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या गावातील उपलब्ध नोंदी तपासता येणार असून, प्रमाणपत्रासाठी आवश्यक पुराव्यांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

१३ हजार ७०७ अर्ज मंजूर

जात प्रमाणपत्रासाठी आतापर्यंत प्राप्त १३ हजार ७१३ अर्जांपैकी १३ हजार ७०७ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. कागदपत्रांतील त्रुटींमुळे ६ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. ९ सप्टेंबर २०२६ अखेर प्रमाणपत्रासाठी एकही अर्ज प्रलंबित नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

हैदराबाद गॅझेटवर आधारित प्राप्त अर्जांवरही शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. २ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्राप्त ८० अर्जांपैकी ७६ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

००००

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed