• Thu. Sep 10th, 2026

जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे गतीने पूर्ण करावी – मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 9, 2026

मुंबई, दि. ९ : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात सुरू असलेल्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेसह सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांचा आढावा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला. योजनेच्या कामांमधील अडचणी विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी समन्वयाने सोडवून कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

योजनेच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने तातडीने दूर कराव्यात. कामांना गती देऊन ही योजना निर्धारित वेळेत पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सिल्लोड तालुक्यातील ग्रीड पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेअंतर्गत जॅकवेल व पंपहाऊस, रिव्हर ब्रीज, अशुद्ध जलउद्‌वाहन वाहिनी, टप्पा एक व टप्पा दोन, डोंगरगाव येथील जलशुद्धीकरण केंद्र, मुख्य संतुलन जलकुंभ आदी कामे प्रगतीपथावर आहेत.

गोळेगाव, खुल्लोड व सराटी येथील मुख्य संतुलन जलकुंभांची कामेही सुरू आहेत. या योजनेच्या कामांसाठी राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच रस्त्यालगत जलवाहिनी टाकण्यासाठी आवश्यक परवानगी व प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटीया, सहसचिव गीता कुलकर्णी, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे, जल जीवन मिशनच्या अतिरिक्त संचालक दीपाली देशपांडे, अधीक्षक अभियंता अजय सिंग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकारी अभियंता श्रीमती पलांडे, जिल्हा परिषदेचे प्रभारी कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेळके, सिल्लोडचे उपअभियंता अप्पासाहेब काटकर आदी उपस्थित होते.

0000

गजानन पाटील/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed