• Wed. Sep 9th, 2026

ॲपआधारित टॅक्सी चालकांची संपूर्ण माहिती तीन महिन्यांत सादर करा – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 9, 2026

मुंबई, दि. ९ : ‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या चालकांची संपूर्ण माहिती परिवहन विभागाकडे तीन महिन्यांत सादर करावी. चालकांची ओळख, वास्तव्य आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पात्र चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’च्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात झाली. यावेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, परिवहन विभागाचे संबंधित अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे तसेच भारत टॅक्सी, रॅपिडो, उबर, ओला, शालिनी कॅब आणि सिटीफ्लो या ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ॲपआधारित टॅक्सी सेवेत कार्यरत चालकांना कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा. चालक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना उपलब्ध असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ॲपआधारित टॅक्सी चालकांची ओळख, वास्तव्य आणि कागदपत्रांची पडताळणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित चालकांचे डोमिसाइल प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच चालकांना व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक राहणार असून, पात्र चालकांना परिवहन विभागाकडून बॅज देण्यात येणार आहे. पात्र चालकांना कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व देऊन त्यांच्या कुटुंबीयांनाही मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

ॲग्रीगेटर धोरणानुसार चालकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच प्रवाशांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने सुनिश्चित करावी. अपघात तसेच गुन्हेगारीच्या घटना टाळण्यासाठी चालकांच्या अर्जांची, ओळखपत्रांची आणि अन्य आवश्यक कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या.

संबंधित ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांनी त्यांच्या चालकांची संपूर्ण माहिती संकलित करून परिवहन विभागाकडे सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत चालकांची संपूर्ण माहिती, डोमिसाइल प्रमाणपत्र तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

0000

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed