• Wed. Sep 9th, 2026

Nagpur Crime : अरे धत तेरी की! चोरीचं कारण ऐकून नागपूर पोलीसही चक्रावले, चोरट्यांनी कॅफेत आणि पान टपरीत सिगारेटचे पाकिटं अन् पैसे पळवले

वाढदिवसाच्या पार्टीसाठी आरोपींनी चक्क चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाढदिवसाचा खर्च भागावा यासाठी नागपुरात चौघांनी चक्क कॅफेमध्ये आणि पान ठेल्यात पैसे आणि सिगारेटचे पाकिटे चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी अत्यंत बारकाईने सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक मुद्दे लक्षात घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : मित्राचा वाढदिवस फार्महाऊसवर धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने चार मित्रांनी चक्क चोरीचा मार्ग अवलंबल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. पार्टीचा खर्च भागविण्यासाठी कॅफे आणि पानठेल्यांना लक्ष्य करून रोख रक्कम आणि सिगारेटची पाकिटे चोरणाऱ्या टोळीचा क्राईम ब्रँचच्या युनिट-3ने पर्दाफाश केला. पोलिसांनी तीन तरुणांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलगाच या पार्टीचा ‘बर्थडे बॉय’ असल्याचे तपासात समोर आले आहे. पार्टी करण्यापूर्वीच हे चारही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

नागपूर शहरातील कोतवाली आणि सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 ऑगस्टच्या मध्यरात्री नंदनवन सीमेंट रोड परिसरातील सिग्नेचर चाय सुट्टा कॅफे येथे चोरट्यांनी चोरी केली. कॅफेचे शटर उघडून आत प्रवेश केल्यानंतर आरोपींनी कॅश काउंटरमधील रोख रक्कम तसेच सिगारेटची पाकिटे लंपास केली.

कॅफे आणि पान सेंटरवर चोरी

कॅफे संचालकाच्या माहितीनुसार, सुमारे 10 हजार रुपये रोख आणि 20 हजार रुपये किंमतीची सिगारेटची पाकिटे चोरीला गेली. या कॅफेमध्ये चोरी केल्यानंतर आरोपींनी सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीमा हॉस्पिटल चौकाजवळील मिक्की पान सेंटरलाही लक्ष्य केले. तेथूनही रोख रक्कम आणि सिगारेटची पाकिटे चोरी करण्यात आली.

चोरी करण्याची पद्धत सारखी असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास

एकाच टोळीने सलग दोन ठिकाणी चोरी केल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरुवात केली. दोन्ही घटनांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना पोलिसांनी आरोपींचा पेहराव, चोरी करण्याची पद्धत आणि घटनास्थळी त्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्यात आले. त्यानंतर दोन्ही चोरीच्या घटनांमागे एकाच टोळीचा हात असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.

पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?

दरम्यान, चोरी केलेला माल वनदेवी चौक परिसरातील एका पानठेल्यावर विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माल विकल्यानंतर चोरीच्या रकमेतून पार्टीचा खर्च करण्यासाठी पैशांचे वाटप केले जाणार असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी इटाभट्टी चौक परिसरात सापळा रचला. आरोपी तिथे येताच पोलिसांनी घेराबंदी करून पीयूष सोनटके, मोहम्मद जीशान अंसारी आणि वृतांत द्रविडकर या तिघांना ताब्यात घेतले.

आरोपींकडून गुन्ह्याची कबुली

तिघेही यशोधरानगर परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी कॅफे आणि पानठेल्यात चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल तसेच काही रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच आरोपींवर यापूर्वी कोणते गुन्हे दाखल आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

चोरीचं कारण चक्रावून टाकणारं

दरम्यान, चोरीमागील कारण समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. मित्राचा वाढदिवस फार्महाऊसवर मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा चौघांचा बेत होता. मात्र, पार्टीसाठी आवश्यक पैसे नसल्याने चोरी करून रक्कम उभी करण्याचे त्यांनी ठरवले. चोरीतून मिळणाऱ्या पैशांतून वाढदिवसाची पार्टी करण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. मात्र, ‘बर्थडे बॉय’चा वाढदिवस साजरा होण्याआधीच त्याच्यासह संपूर्ण टोळी पोलिसांच्या ताब्यात सापडली असून पुढील तपास सुरू आहे.