• Wed. Sep 9th, 2026

आपत्ती पुनर्प्राप्ती डेटा सेंटरची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करावी – मंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 6, 2026

नागपूर दि ६: शासनाच्या विविध विभागांच्या माहितीची सुरक्षितता, उपलब्धता आणि विश्वासार्हता सांभाळण्यासाठी नागपूर येथील आपत्ती पुनर्प्राप्ती डेटा सेंटर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे सेंटर पूर्ण कार्यान्वित झाल्यावर शासकीय कामकाज अधिक विश्वसनीय, सुरक्षित व कार्यक्षमतेने होण्यास मदत होईल. त्यादृष्टीने येथील उर्वरित कामे निर्धारित कालावधीत गतीने पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज येथे दिले.

गड्डीगोदाम मेट्रो स्थानक येथे सुमारे १४ हजार चौरस फूट जागेत उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक आपत्ती पुनर्प्राप्ती (Disaster Recovery) डेटा सेंटरची ॲड. आशिष शेलार यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील कामांचा सविस्तर आढावा घेतला. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे नोडल अधिकारी लक्ष्मीकांत त्रिपाठी, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक संदीप बापट, महामेट्रोचे महाप्रबंधक सुधाकर उराडे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेला आपत्ती पुनर्प्राप्ती (Disaster Recovery) डेटा सेंटरचा हा प्रकल्प शासनाच्या विविध विभागांची माहिती सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार असल्याचे सांगून मंत्री आशिष शेलार यांनी डेटा सेंटरची आपत्कालीन परिस्थितीतील कार्यक्षमता आणि सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचना केल्या. त्यादृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या पुढील नियोजनाची माहिती त्यांनी घेतली.


पाहणीदरम्यान तांत्रिक चर्चा व आढावा
डेटा सेंटरच्या सुरळीत आणि अखंडित कामकाजासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबींची मंत्री शेलार संबंधितांकडून माहिती घेतली. सर्व्हर रूम, कंट्रोल रूम तसेच महत्वाचे विविध कक्ष, इमर्जन्सी युनिट व सुरक्षेची रचना जाणून घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना येथील संपूर्ण परिसर अवगत करून दिला. येथील सर्व्हर सातत्याने थंड ठेवण्यासाठी लागणाऱ्या कूलिंग सिस्टीम आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची उपलब्धता व पर्यायी व्यवस्थेविषयी विशेष सजगता ठेवावी. येथील प्रलंबित कामांची वेळेत पूर्तता करण्यासाठी विविध विभागांमध समन्वय राखून कामाच्या गतीवर लक्ष ठेवावे असे सांगून मंत्री शेलार यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती व पुढील प्रत्येक टप्प्यातील कामांच्या नियोजनाची माहिती घेतली.

००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed