• Sun. Sep 6th, 2026

Maharashtra Rain : श्रींच्या आगमनाला तुफान पाऊस येणार, 13 ते 17 सप्टेंबर मुसळधार पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज

राज्यात येत्या 13 सप्टेंबरला मुसळधार पाऊस येणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे येत्या 14 सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे श्रींच्या आगमनावेळी तुफान पाऊस येणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. श्रावण महिना आता संपत आला असला तरी श्रावणसरी बरसलेल्या दिसल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस न पडल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. तसेच शेतीसाठी देखील अपेक्षित पाऊस न पडल्याने शेतकरीदेखील चिंतेत आहेत. असं असताना हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी नवी आशा देणारा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या अंदाजानुसार राज्यात गणेशोत्सवाच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस पडणार आहे.

“राज्यात 13 ते 17 सप्टेंबर या काळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील ज्या भागांमध्ये पाऊस पडला नव्हता, तसेच धाराशिव, लातूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस पडला नव्हता. पण आता या भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. हा पाऊस पिकांना जीवनदान देणारा पाऊस ठरणार आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे”, असं पंजाबराव डख म्हणाले आहेत.

“यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, लातूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये 13 सप्टेंबरपासून चांगला जोराचा पाऊस असणार आहे”, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला.

दक्षिण महाराष्ट्रात अपेक्षित पाऊस का पडला नाही?

“दक्षिण महाराष्ट्रातील लातूर, बीड, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस पडत नव्हता. विशाखापट्टनम येथे कमी दाबाचे पट्टे तयार व्हायचे. तिथून ते छत्तीसगड राज्यात जायचे. तिथून ते नागपूर, वर्धा जायचे. तिथून ते इंदौरमार्गे राजस्थान, मध्यप्रदेश मार्गे दिल्लीकडे जायचे. या मार्गाने दोन-तीन कमी दाबाचे पट्टे गेले. परिणामी आपल्या महाराष्ट्रातील ऑगस्ट महिन्याचा पाऊस थांबला. पण आता 13 सप्टेंबरला चांगल्या पावसाची शक्यता आहे”, अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली.

‘श्रींच्या आगमनावेळेस मुसळधार पाऊस पडणार’

“महाराष्ट्रातील पिकांच्या भवितव्याचा पाऊस हा श्रींच्या आगमनावेळेस 13 सप्टेंबरला येणार आहे. 13 ते 17 सप्टेंबरला येणारा पाऊस हा तारणारा पाऊस असणार आहे”, असा दावा पंजाबराव डख यांनी वर्तवलं. तसेच “राज्यात 9 सप्टेंबरच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. पण ज्या भागात पडेल तिथे पिकांना तारणारा पाऊस असणार आहे”, असंदेखील डख म्हणाले.

’13 ते 17 सप्टेंबर निर्णायक पावसाची शक्यता’

“पुढच्या पाच ते सहा दिवसांत मोठा पाऊस पडणार नाही. मोठ्या पावसासाठी 12 सप्टेंबरपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. कोकणपट्टी, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, इगतपुरी अशा सगळीकडे 13 ते 17 सप्टेंबरच्या दरम्यान निर्णायक पाऊस पडेल”, अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली.