सोलापूर, २ ऑगस्ट २०२६ (जिमाका) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची बँक आहे. ही बँक नेहमी यशाच्या दिशेने वाटचाल करत राहावी. या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ दिले तरच शेतकरी उभा राहील. त्यामुळे मध्यवर्ती बँक नेहमी नफ्यात असली पाहिजे आणि तिच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवक सहकारी पतसंस्थेच्या ९१ व्या सर्वसाधारण सभेत व आमदार राजेंद्र राऊत यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री गोरे बोलत होते. यावेळी आमदार राऊत यांचा पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि जिल्हा दूध संघ सुरू करण्याबाबत शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले. बँक कर्मचारी सहकारी संस्थांनी स्वतः विश्वस्ताप्रमाणे काम केले तर या संस्था प्रगतीच्या शिखरावर जातील, असे ते म्हणाले. मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या प्रगतीची आधारस्तंभ असून बँकेने शेतकऱ्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्यांना कृषी कर्ज त्वरित उपलब्ध होईल, या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.

आमदार राजेंद्र राऊत हे एक धडाडीचे कार्यकर्ते असून ते समाजसेवेसाठी नेहमी आग्रही असतात. सामान्य माणसाचे प्रश्न ते तळमळीने जाणतात आणि त्यासाठी धावून जातात, असे गौरवोद्गार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काढले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, माजी आमदार राम सातपुते, नगरसेविका रोहिणीताई तडवळकर, दिलीप कोल्हे यांच्यासह अधिकारी, बँक कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्रीरंग सातपुते यांनी केले.
000
