साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: आरोग्य क्षेत्राशी संबंधित असणारी राज्याचे आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अशी दोन मंत्रिपदं असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या टोळ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. करवीर पोलिसांनी कदमवाडी येथील ‘प्रतिमा हॉस्पिटल’वर धाड टाकून एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत धक्कादायक बाब अशी की, राज्याच्या आरोग्य विभागात सिव्हिल सर्जन आणि सहाय्यक संचालक म्हणून काम केलेले डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड हेच या बेकायदेशीर काळ्या धंद्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.
असा उघड झाला गुन्हा
कोल्हापुरात नुकताच 26 जुलै रोजी कळंबा येथील ‘थ्री स्टार लॉजिंग’वर छापा टाकण्यात आला होता. तिथे अवैध गर्भलिंग चाचणी करताना संशयित स्वप्नील पाटील आणि दोन महिला एजंटना पकडण्यात आले होते. यातील एजंट अश्विनी शिंदे हिच्या चौकशीतून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. ज्या महिलांच्या गर्भात ‘मुलगी’ असल्याचे निष्पन्न व्हायचे, अशा महिलांना अश्विनी शिंदे ही कदमवाडीतील भीमनगर हौसिंग सोसायटीत असलेल्या डॉ. गायकवाड यांच्या ‘प्रतिमा हॉस्पिटल’मध्ये गर्भपातासाठी पाठवत असे.
बनावट पेशंटचा यशस्वी सापळा
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपाधीक्षक आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक धाडसी योजना आखली. पोलिसांनी एक बनावट रुग्ण तयार करून प्रतिमा हॉस्पिटलमध्ये पाठवला. डॉ. गायकवाड यांनी कोणत्याही अधिकृत कागदपत्रांची किंवा केसपेपरची पूर्तता न करता या रुग्णाला तात्काळ ॲडमिट करून घेतले. इतकेच नव्हे तर, त्यांनी स्वतःकडील बेकायदेशीर पोर्टेबल सोनोग्राफी मशिनद्वारे तपासणी करून गर्भपाताची तयारी दर्शवली आणि रुग्णाला गर्भपाताच्या गोळ्याही दिल्या. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा टाकून डॉक्टरांना रंगेहाथ पकडले.
उच्चपदस्थ अधिकारी ते गुन्हेगार
डॉ. चंद्रकांत गायकवाड यांची पार्श्वभूमी अत्यंत धक्कादायक आहे. ते केवळ खाजगी डॉक्टर नसून त्यांनी शासकीय सेवेत अत्यंत वरिष्ठ पदांवर काम केले आहे. त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि बीड या जिल्ह्यांत सिव्हिल सर्जन म्हणून जबाबदारी पार पाडली होती. तसेच ते मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त अधीक्षक होते आणि पुणे येथून सहाय्यक संचालक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. “इतक्या जबाबदार पदावर राहिलेल्या व्यक्तीने निवृत्तीनंतर गांधीनगर, सोळांकुर, हातकणंगले आणि इतर शहरांतही अशा प्रकारची अवैध कृत्ये केल्याचा संशय आहे,” अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे.
कठोर कायदेशीर कारवाई
पोलिसांनी घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशिन, गर्भपातासाठी वापरली जाणारी घातक उपकरणे आणि औषधे जप्त केली आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम आणि पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अटकेची प्रक्रिया सुरू असतानाच प्रकृती खालावल्यामुळे डॉ. गायकवाड यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आप्पासो पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी यशस्वी केली आहे. तर या रॅकेटमध्ये आणखी किती डॉक्टरांचे हात गुंतले आहेत, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा