• Wed. Jul 29th, 2026

    Nagpur Heavy Rain : मुसळधार पावसाने नागपूरला झोडपले; सोमलवार शाळेत चिमुकले अडकले, गुडघाभर पाण्यातून रेस्क्यू ऑपरेशन

    Nagpur Heavy Rain : मुसळधार पावसाने नागपूरला झोडपले; सोमलवार शाळेत चिमुकले अडकले, गुडघाभर पाण्यातून रेस्क्यू ऑपरेशन

    नागपुरात दुपारनंतर अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने संपूर्ण शहारात हाहा:कार माजवला. मुसळधार पावसामुळे सोमलवार शाळेत विद्यार्थी आणि पालक अडकले होते. या सर्वांची रेस्क्यू ऑपरेशन करुन सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : विदर्भात पावसाने घेतलेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी दुपारपासून नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने नागपूर शहराची अक्षरशः दाणादाण उडवली. अवघ्या काही तासांत शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असताना खामला परिसरातील सोमलवार शाळेलाही पावसाचा मोठा फटका बसला. शाळेच्या मैदानात तळ्यासारखे पाणी साचल्याने चिमुकले विद्यार्थी, शिक्षक आणि काही पालक शाळेतच अडकून पडले. अखेर गुडघाभर पाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.

    खामला येथील राणाप्रताप नगर मार्गावरील सोमलवार स्कूलच्या आवारात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शाळेच्या मैदानात तब्बल दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने संपूर्ण परिसराला तलावाचे स्वरूप आले. विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेल्या स्कूल व्हॅन आणि इतर वाहनांनाही पाण्याचा फटका बसला. पाण्याची पातळी वाढत असल्याने शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची चिंता वाढली.

    विद्यार्थ्यांचे रेसक्यू ऑपरेशन

    परिस्थिती गंभीर होताच अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाच्या मदतीने गुडघाभर पाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. लहान मुलांना उचलून पाण्यातून बाहेर काढतानाचे दृश्य पाहून पालक आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली.

    रस्त्यांना अक्षरश: नदीचे स्वरुप

    दरम्यान, मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक प्रमुख आणि अंतर्गत रस्ते जलमय झाले. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, नागरिकांना कामानिमित्त बाहेर पडणेही कठीण झाले.

    Nagpur News

    दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरले

    पावसाचे पाणी रस्त्यांवरून थेट अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये शिरले. त्यामुळे नागरिकांचे आणि व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक वाहनांनाही पाण्याचा फटका बसला. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व अंडरपास बंद करण्यात आले. तर प्रशासनाने पाणी साचलेल्या काही अंडरपासमधील वाहतूक बंद केली. मात्र, शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

    नागरिकांकडून संताप व्यक्त

    या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पाणी निचरा व्यवस्था आणि रस्त्यांवरील जलनिस्सारणाची योग्य व्यवस्था का करण्यात आली नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच शहरातील अनेक भागांना जलमय परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.