• Mon. Jul 27th, 2026

    Ram Mandir Case : मंदिरं कशी चालवावी याचं प्रशिक्षण शासनाला नाही, आचार्यांच्या ताब्यात द्या, जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांची मागणी

    Ram Mandir Case : मंदिरं कशी चालवावी याचं प्रशिक्षण शासनाला नाही, आचार्यांच्या ताब्यात द्या, जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांची मागणी

    जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी मोठी मागणी केली आहे. देशातील मंदिरं ही आचार्यांची समती गठीत करुन त्यांच्या ताब्यात द्यावीत, अशी मागणी नरेंद्राचार्य महाराजांनी केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणावर जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी मोठी मागणी केली आहे. “राम मंदिरामध्ये झालेल्या चोरीमुळे हिंदू धर्मियांच्या हृदयाला ठेच पोहचलेली आहे. चोरीची गोष्ट अत्यंत निंदनीय आहे. मुस्लिमांच्या मशिदी, ख्रिश्चनांचे चर्च जसे त्यांच्या ताब्यात आहेत, तशी हिंदूंची सर्व मंदिरं अधिकृत शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य अशा आचार्यांची समिती गठीत करून त्यांच्या ताब्यात द्यावीत”, अशी मागणी जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी केली आहे. “मंदिरं कशी चालवली पाहिजेत याचं प्रशिक्षण शासनाला नाही, शासन हे निधर्मवादी आहे”, असं नरेंद्राचार्य महाराज म्हणाले.

    “धर्म, धर्माची संस्कृती, अध्यात्म, धर्माची काळजी घेणं हे शासनाला कळणार नाहीत. त्यांना कळावं ही अशी इच्छा ठेवणं पण चुकीचे आहे. त्यामुळे आचार्यांची समिती गठीत करून त्यांच्या ताब्यात मंदिरं द्यावीत”, अशी मोठी मागणी नरेंद्राचार्य महाराज यांनी केली.

    आमच्या ताब्यात मंदिरं द्या, नरेंद्राचार्य महाराजांची मागणी

    “मंदिरं आमच्या ताब्यात आली तर त्याची धार्मिकता जपता येईल. जिथे शासन आपला अंकुश ठेवेल तिथे कर्मचारी येणार आणि माणूस म्हटलं की, चुका करणारच. झालेली गोष्ट निंदनीय आहे. सरकारने त्यावर पावलं उचलली आहेत. तसेच या प्रकरणात अटक पण झालेली आहे. पण सनातनी लोकांच्या हृदयाला जी ठेच पोहचली आहे, ती भरपाई कोणी भरून देऊ शकत नाही”, असं नरेंद्राचार्य महाराज म्हणाले.

    “गोरगरिबांनी पै पै जमा करून राम मंदिराला पैसे दिले आहेत आणि तिथे जेव्हा चोरी होते, तेव्हा लोकांच्या भावनेला ठेच पोहचते. शासन कारवाई करेल, पण भावना परत आणता येत नाहीत”, अशी खंत नरेंद्राचार्य महाराज यांनी व्यक्त केली.

    विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया

    राम मंदिरातील दान चोरी प्रकरणावरुन विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला गेला. त्यावरही नरेंद्राचार्य महाराजांनी प्रतिक्रिया दिली. “विरोधकांचं काम त्यांनी केलेलं आहे. विरोधकांनी हिंदूंच्या अस्मिता, प्रेम व्यक्त करू नयेत, असं कुठे लिहिलेलं नाही. देव फक्त हिंदुत्ववादी पक्षांचा नाही, देव सर्वांचा आहे. संविधानाने धर्माला कमी लेखलेलं नाही, विरोधकांनी पण कमी समजू नये. राजकीय मंडळींनी विरोधासाठी विरोध करू नये”, असं मत नरेंद्राचार्य महाराज यांनी मांडलं.

    महाराजांची धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया

    नरेंद्राचार्य महाराज यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरही प्रतिक्रिया दिली. “सरकारने उचललेलं पाऊल अतिशय उत्तम आहे. कठोरातील कठोर कायदे केले पाहिजेत. मुलांच्या आयुष्याशी खेळण्याचा आपल्याला अधिकार नाही. पेपर फुटतात हे आपल्याला शोभनीय नाही. अनेक वेळा हे झाल्याने मुलांच्या रागाचा स्फोट झाला. नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही, त्यासाठी कायदा केला पाहिजे”, अशी भूमिका नरेंद्रचार्य महाराजांनी मांडली.