• Sat. Jul 25th, 2026

    Sikkim Tunnel Blast: विषारी बोगद्यातून २५ मृतदेह बाहेर; नागपूरच्या वेकोलि पथकाची सिक्कीममध्ये यशस्वी मोहीम,सलग ७२ तास होत शोधकार्य सुरू

    Sikkim Tunnel Blast: विषारी बोगद्यातून २५ मृतदेह बाहेर; नागपूरच्या वेकोलि पथकाची सिक्कीममध्ये यशस्वी मोहीम,सलग ७२ तास होत शोधकार्य सुरू

    Sikkim Tunnel Blast: सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात पॉवर कॉर्पोरेशनच्या बोगद्यात झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सलग ७२ तास चाललेल्या शोध मोहिमेत विषारी बोगद्यातून २५ मृतदेह बाहेर काढण्यात आले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा .प्रतिनिधी ,नागपूर: वेकोलिच्या या १४ सदस्यीय पथकाने खाण दुर्घटनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक उपकरणे, गॅस मॉनिटरिंग यंत्रणा आणि सुरक्षा प्रोटोकॉलच्या आधारे ही मोहीम राबविली. धोकादायक वातावरण, मर्यादित ऑक्सिजन वेळ, चिखल, अंधार आणि स्फोटाचा धोका अशा अनेक अडथळ्यांवर मात करत नागपूरच्या या पथकाने सिक्कीममधील शोधमोहीम पूर्ण केली. या कामगिरीमुळे वेकोलिच्या खाण बचाव पथकाच्या कौशल्याची पुन्हा एकदा दखल घेतली जात आहे.

    सलग ७२ तास चालले बचावकार्य

    सिक्कीममधील नामची जिल्ह्यात नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या बोगद्यात झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सलग ७२ तास चाललेले शोध व बचावकार्य अखेर पूर्ण झाले. नागपूरस्थित वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (वेकोलि) १४ सदस्यीय विशेष खाण बचाव पथकाने विषारी वायूने भरलेल्या बोगद्यात दोन किलोमीटरहून अधिक आत प्रवेश करून दुर्घटनेतील सर्व २५ मृतदेह बाहेर काढले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही मोहीम पूर्ण करण्यात पथकाला यश आले.

    नागपूरच्या वेकोलिचे विशेष खाण बचाव पथक तातडीने सिक्कीममध्ये दाखल

    बोगदा कोसळल्यानंतर झालेल्या मिथेन वायूच्या स्फोटामुळे संपूर्ण परिसराला गॅस चेंबरचे स्वरूप आले होते. या स्फोटात २२ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा शोध घेण्यासाठी बोगद्यात गेलेले आणखी तीन जणही विषारी वायूच्या विळख्यात सापडल्याने मृत्युमुखी पडले. स्थानिक यंत्रणा आणि इतर पथकांचे प्रयत्न अपुरे ठरल्यानंतर नागपूरहून वेकोलिचे विशेष खाण बचाव पथक तातडीने सिक्कीममध्ये पाचारण करण्यात आले. या पथकाला विशेष विमानाने घटनास्थळी पाठविण्यात आले.

    Maharashtra TimesFDA Raid : टोस्ट बनवताना शेजारी शौचालय, तंबाखूच्या पिचकाऱ्या, ‘येस फाईन बेकरी’वर छापा; आतापर्यंतचा सर्वात मोठा कारनामा उघड

    वेकोलिचे महाव्यवस्थापक दिनेश बिसेन यांची प्रतिक्रिया

    ‘लोकांचे प्राण वाचवणे हे आमचे मुख्य काम असते. मात्र, घटनास्थळी पोहोचल्यानंतर आत जिवंत कोणी नसून केवळ मृतदेह बाहेर काढायचे आहेत, हे स्पष्ट झाले. त्यामुळे मानसिकदृष्ट्या ही मोहीम अत्यंत कठीण होती. तरीही आमच्या पथकाने संयम, प्रशिक्षण आणि धैर्याच्या बळावर मोहीम पूर्ण केली’, अशी माहिती वेकोलिचे महाव्यवस्थापक दिनेश बिसेन यांनी दिली.

    एक चूकही जीवघेणी

    पथकाकडे ऑक्सिजन पुरवणारे विशेष गॅस प्रोटेक्शन किट्स होते. एका किटची क्षमता जास्तीत जास्त दोन तासांची असते. त्यामुळे दीड तासांच्या आत शोधमोहीम पूर्ण करून उर्वरित वेळेत बोगद्याबाहेर परतणे अत्यावश्यक होते. प्रत्येक फेरी काळजीपूर्वक आखावी लागत होती. आतमध्ये मिथेनसह इतर विषारी वायूंचे प्रमाण असल्याने एक चूकही जीवघेणी ठरू शकत होती.

    बोगद्यातील भीषण परिस्थिती

    बोगद्यात प्रवेश केल्यानंतर पहिला सुमारे एक किलोमीटरचा टप्पा वाहनाने पार करण्यात आला. त्यानंतर पुढील रस्ता पायी कापावा लागला. डिझेल वाहनांच्या धुरामुळे पुन्हा स्फोट होण्याचा धोका असल्याने वाहने पुढे नेता येत नव्हती. आतमध्ये गुडघाभर चिखल साचला होता. अनेक ठिकाणी पडझड, अंधार आणि घुसमटणारे वातावरण यामुळे शोधकार्य अधिकच अवघड झाले होते.

    Maharashtra TimesTukaram Mundhe : खिचडीत जिवंत अळी तर बिर्याणीत माशी, नागरिकांच्या जीवाशी खेळ, मालकांचे धाबे दणाणले; FDA कडून नांदेडमध्ये प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने रद्द

    पथकाचे नियोजनबध्द प्रयत्न

    मृतदेह अत्यंत विदीर्ण अवस्थेत चिखलाखाली अडकलेले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढताना पथकाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर मोठा ताण सहन करावा लागला. ऑक्सिजन किटमधील कार्बन डायऑक्साइड शोषून घेणारी यंत्रणा कालांतराने तापू लागत असल्याने प्रत्येक मिनिट महत्त्वाचा ठरत होता. अशा परिस्थितीतही पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने आत-बाहेर फेऱ्या मारत सर्व मृतदेह बाहेर काढले.

    टीम मटा ऑनलाइन

    लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.… आणखी वाचा