Maharashtra Rain Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोरदार कमबॅक झाला असून सर्वत्र मुसळधार सरी बरसत आहेत. मुंबई, पुणे, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात हवामान विभागाने २३ जुलै रोजी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बंगालच्या उपसागरालगत आणि आंध्र प्रदेशाच्या वरच्या काही भागांत हवेची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. तेथून अरबी समुद्रातपर्यंत पसरलेल्या द्रोणीय रेषेमुळे महाराष्ट्रातील मान्सून सध्या सक्रिय आहे. प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो आहे. पुण्यात शहर आणि जिल्ह्यातही रविवारपासून पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळनंतर पावसाने जोर धरला. बुधवारी सकाळपासूनच मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमध्ये आकाश ढगाळ होते, दुपारी बाराच्या दरम्यान मोठी सर आली आणि त्यानंतर अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला.
Maharashtra Rain Updates : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पुढील तीन दिवस पावसाचं तांडव, हवामान खात्याचा ताजा अंदाज
घाट माथ्यावरही मुसळधार पाऊस पडला. ताम्हिणीमध्ये २४ तासांत (बुधवारी सकाळपर्यंत) २७५ मिमी, भिरा येथे ३०९, लोणावळ्यात १४२, मुळशीमध्ये १५१ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्हा आणि धरणक्षेत्रांतही पावसाचा जोर कायम होता. पुढील दोन दिवस तापमानातील घट कायम राहणार असल्याची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे.
घाटांमध्ये ‘रेड अलर्ट’
पुढील दोन दिवस दुपारनंतर आकाश मुख्यतः ढगाळ राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर गुरुवारी दिवसभरात जोरदार ते काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने ‘आयएमडी’ने घाट परिसरात ‘रेड ॲलर्ट’ देण्यात आला आहे.
मुंबई आणि कोकणात काय परिस्थिती?
मुंबई आणि ठाणे शहराला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला होता. तो आता यलो करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. ४०-५० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये काय स्थिती ?
सातारा जिल्ह्यातही आज पाऊस थैमान घालणार असून घाटमाथ्याच्या परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाबळेश्वर आणि लगतच्या भागांमध्ये गुरुवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर शहरातील पश्चिम भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि पूर्व भागात पावसाचा जोर कमी राहील. दरम्यान, सांगली व सोलापूर जिल्ह्यांमध्ये ३०-४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Weather : पुणे घाट परिसराला रेड अलर्ट, मुंबईत जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज; अरबी समुद्रावरुन येणारे वारे अधिक सक्रिय
उत्तर महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती?
नाशिकमध्ये घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहरात सर्वत्र जोरदार सरी बरसत आहेत. धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे.
मराठवाडा आणि वदर्भात हवामान कसं असेल?
छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात अखेर पावसाचा जोर वाढणार आहे. नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आली आहे.
