Pune Water Cut: एल निनोची शक्यता आणि जून महिन्यात निर्माण झालेल्या पावसाच्या तुटीमुळे पुण्यात पाणीकपात लागू करण्यात आली होती. त्यामुळे पुणेकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. पण गेल्या काही दिवसांत पावसाच्या दमदार एन्ट्रीमुळे शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
महापालिकेकडून नियोजनबद्ध पद्धतीने पुरवठा सुरू
महापौरांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठा, वितरण व्यवस्था आणि पाणीपुरवठा यंत्रणेचा महापालिकेकडून नियमित आढावा घेतला जात आहे. शहरातील सर्व भागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच, कुठेही तांत्रिक अडचण किंवा जलवाहिनी गळतीची घटना घडल्यास त्यावर तातडीने कार्यवाही केली जात असल्याचा दावाही महापौरांनी केला. मान्सून सुरू असला, तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून आणि जबाबदारीने करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
Weather Update: पुण्यात पावसाने मोडला १२ वर्षांचा विक्रम, घाटांमध्ये ‘रेड अलर्ट’; चार दिवस राज्यात पाऊस थैमान घालणार
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाल्यानंतर १५ जूनपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता. शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्यांच्या आगमनापूर्वी दिवसाआड पाणीपुरवठा रद्द करण्यात आला होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने पाणीकपातीचा निर्णय रद्द करावा लागला. त्यामुळे नागरिकांनाही काही काळ दिलासा मिळाला होता.
ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालख्या शहराबाहेर पडल्यानंतर पाणीकपात १५ जुलैपासून पुन्हा पूर्ववत करण्याचे सुतोवाच महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी केले होते. त्यानंतर महापौरांनी तातडीने आपली भूमिका जाहीर करून पाणीकपातीचा निर्णय आठवडाभर स्थगित ठेवण्याचे आदेश दिले होते.
धरणांत पुरेसा पाणीसाठा
यंदा धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन ‘टीएमसी’ने कमी असला, तरी सध्याच्या परिस्थितीत धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणीकपात करण्याची आवश्यकता भासत नसल्याचे चित्र दिसते आहे. “पुणे शहरात सध्या कोणतीही अथवा पाणीकपात करण्यात आलेली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पाण्याचा वापर जबाबदारीने करावा,” अशी माहिती पुण्याच्या महापौर मंजूषा नागपूरे यांनी दिली आहे.
ST Bus: एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या खिशाला कात्री; दीड वर्षांत दोनदा भाडेवाढ, तिकीट किती टक्क्यांनी वाढलं?
वर्षभराच्या पाण्याची मिटली चिंता
गेल्या चोवीस तासांत खडकवासला वगळता उर्वरित धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात दोन अब्ज घनफूट (टीएमसी) वाढ झाली आहे. प्रकल्पात आतापर्यंत २०.१६ ‘टीएमसी’ इतका पाणीसाठा जमा झाल्याने पुणेकरांच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. दरम्यान, धरण प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा जमा झाल्यास विसर्ग करण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरण प्रकल्पात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून संततधार पावसाने हजेरी लावल्याने खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत आणि अन्य धरणांची पातळी वाढली आहे.
