• Sat. Sep 5th, 2026
CJP Protest : सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाचे धग मुंबई, पुणे आणि नागपुरात; दादरमध्ये चैत्यभूमी परिसरात विद्यार्थी आक्रमक

कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाचे धग महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. मुंबईच्या दादर येथे चैत्यभूमी परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा प्रयत्न केला. तर पुणे आणि नागपुरातही विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दिल्लीत संसद भवनावर कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा काढण्यात आला. दिल्लीच्या जंतर मंतर येथून निघालेला मोर्चा रोखण्याचा प्रयत्न पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी केला. पोलिसांनी आंदोलकांच्या दिशेला अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. यासोबत आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला. तरीदेखील हा मोर्चा दिल्लीच्या संसद भवनापर्यंत पोहोचला आहे. दिल्लीत सुरु असलेल्या घडामोडींचा पडसाद महाराष्ट्रातही पडताना दिसत आहे. मुंबई आणि दिल्लीतदेखील विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

मुंबईत दादर येथील चैत्यभूमी परिसरात विद्यार्थी आंदोलनासाठी पोहोचले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही आंदोलक आक्रमक झाले.

आंदोलक काय म्हणाले?

“आम्हाला पोलिसांपासून संरक्षण नको तर शिक्षणमंत्र्यांपासून संरक्षण द्या. आम्हाला चैत्यभूमीवर उभं राहू देत नाहीत. चैत्यभूमीवर उभं राहायचं नाही? का म्हणून उभं राहायचं नाही? इन्कलाब जिंदाबाद”, असं एक महिला आंदोलक चैत्यभूमीवर म्हणाली.

सीजेपीकडून आंदोलनाची हाक

मिळालेल्या माहितीनुसार, कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीकडून आज संध्याकाळी चार वाजता चैत्यभूमी परिसरात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनासाठी चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमू लागले. पण इथे आंदोलन होणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा आधीच दाखल होता. आंदोलक चैत्यभूमीवर येताच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली.

आंदोलक पोलिसांना काय सांगत होते?

आंदोलकांनी यावेळी पोलिसांकडे आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही केवळ सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांना पाठिंबा देण्यासाठी आणि निषेध व्यक्त करण्यासाठी इथे शांततेत जमलो आहोत. आम्हाला शांततेत निषेध व्यक्त करायचा आहे, असं आंदोलक पोलिसांना सांगत होते. पण मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू आहे. त्यामुळे आंदोलन करण्यास मनाई आहे. यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. यावेळी आंदोलक माध्यमांसमोर भूमिका मांडू लागले. घोषणाबाजी करु लागले. यामुळे परिसरात काही काळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

शिवाजी पार्क परिसरातील विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेतलं

विशेष म्हणजे चैत्यभूमी जवळ असणाऱ्या शिवाजी पार्क परिसरातही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जमलेले होते. त्यांना सु्द्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. “आम्ही फक्त उभे आहोत. घोषणाबाजी केली नाही. कुणाचं नाव घेतलं नाही. तरी आम्हाला का ताब्यात घेतलं जात आहे?”, असा सवाल काही विद्यार्थ्यांनी केलं.

ठाकरे गटानेदेखील दिलेली आंदोलनाची हाक

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कालही चैत्यभूमीवर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यावेळीदेखील पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. आंदोलन आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, चैत्यभूमीवर आज आंदोलन आयोजित करणाऱ्यांना पोलिसांनी याआधीच नोटीस बजावत ताब्यात घेतलं होतं. तरीही अनेक विद्यार्थी आंदोलनासाठी जमले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल होते.

पुण्यातही आंदोलनाची हाक

केवळ मुंबईत नाही तर पुण्यातही विद्यार्थ्यांकडून आंदोलनाची मागणी करण्यात आली. पुण्यातील प्रसिद्ध भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेच्या (FTII) विद्यार्थ्यांनी आज कॉलेज परिसरात आक्रमक आंदोलन पुकारले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेतील अपयश आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणाऱ्या खेळ थांबवण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ पद सोडावे, असं आक्रमक विद्यार्थी म्हणाले.

नागपुरातही विद्यार्थ्यांचं आंदोलन

मुंबई, पुण्यासह नागपुरातही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आंदोलन केलं. सोमवारी संविधान चौकात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता व विश्वासार्हता निर्माण करण्याची मागणी केली.

Nagpur News

संविधान चौकातून आंदोलनात विद्यार्थ्यांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे तसेच विविध मागण्यांचे फलक घेतले होते. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने आपला निषेध नोंदवला.

गेल्या काही वर्षांत विविध भरती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. अनेक वर्षे मेहनत करूनही परीक्षा रद्द होणे किंवा निकालांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारने याबाबत कठोर उपाययोजना करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. यावेळी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला नागपूरमधून जाहीर पाठिंबा देण्यात आला.