• Sat. Sep 5th, 2026

Crime News : आरोपी आनंद आणि त्याचे दोन साथीदार शर्वरीचा भाऊ शिकत असलेल्या शाळेत गेले होते. त्यांनी तिच्या भावाला भेटून शर्वरीला फोन करायला सांगत तिचे थेट लोकेशन मिळवले

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमरावती : बियाणी सायन्स कॉलेजची १८ वर्षीय विद्यार्थिनी शर्वरी हाडके हिच्या निर्घृण हत्याकांडाने अमरावती सुन्न झाले आहे. या प्रकरणातील आरोपी आनंद भड (वय २१), रा. रोही, माना (मूर्तिजापूर) याला राजापेठ पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री गोंदिया येथून बेड्या ठोकल्या. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

भावाच्या शाळेत जाऊन चौकशी

गुरुवारी हत्येपूर्वी आरोपी आनंद आणि त्याचे दोन साथीदार शर्वरीचा भाऊ शिकत असलेल्या सामरा शाळेत गेले होते. त्यांनी तिच्या भावाला भेटून शर्वरीला फोन करण्यास सांगत तिचे थेट लोकेशन मिळवले. त्यानंतर आनंदने रविनगर परिसरात दबा धरून शर्वरीची निर्घृण हत्या केली. हा संपूर्ण प्रकार शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या गुन्ह्यात आनंदला त्याच्या साथीदारांनी मदत केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस त्या दिशेने कसून तपास करत आहेत. आनंदला गोंदियापर्यंत पळून जाण्यास कोणी मदत केली याचा शोध घेतला जात आहे.

नातेवाईक स्मशानातून पोलीस ठाण्यात

शोकाकूल वातावरणात शर्वरीवर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी थेट राजापेठ पोलिस ठाण्यावर धडक दिली. पोलिस आयुक्त राकेश ओला यांना निवेदन देऊन आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली. यावेळी संतप्त जमावाने पोलिस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. तर नेत्यांनी आरोप करीत रोष व्यक्त केला.

Maharashtra TimesFriends Party Dispute : बर्थडे पार्टीचं वचन मोडलं, मित्राची कोर्टात धाव, आश्वासन न पाळणाऱ्या दोस्ताला 41 हजार 250 रुपयांची नोटीस

चाकूचे वार करुन आरोपी पसार

अंबाविहार परिसरात राहणारी शर्वरी गुरुवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास दुचाकीने कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. रविनगर येथील नाल्याच्या पुलाजवळ आधीच दबा धरुन बसलेल्या आनंदने तिला अडवलं. दोघांमध्ये काही मिनिटं भांडणं झाली. त्यानंतर संतापलेल्या आनंदने सोबत आणलेल्या बॅगमधून भाजी कापायचा चाकू काढला आणि शर्वरीवर सपासप वार केल्याचा आरोप आहे. शर्वरी रक्ताच्या थारोळ्यात पडली असतानाच स्थानिक नागरिक आणि वाटसरुंनी आनंदला घेरण्याचा प्रयत्न केला; मात्र तो दुचाकीवरून पसार होण्यात यशस्वी ठरला होता.

दोन वर्षांची ओळख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्वरी आणि आनंद हे दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मूळचा मूर्तिजापूरचा असलेला आनंद बीकॉम पूर्ण केल्यानंतर अमरावतीच्या गोपालनगर भागात भाड्याने राहून एसी दुरुस्तीचे काम करत होता.

Maharashtra TimesCrime News : मुलाच्या कोचने माझ्या नवऱ्याला संपवलं; महिलेने आई-वडिलांसह आयुष्य संपवलं, चिठ्ठीत मोठा उलगडा; बचावलेल्या चिमुरड्याने सगळं सांगितलं

रागातून टोकाचं पाऊल

काही दिवसांपासून शर्वरीने आनंदशी बोलणे बंद केले होते. त्याचा फोन उचलणेही ती टाळत होती. याच रागातून आनंदने हा टोकाचा मार्ग निवडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घरातून भाजी कापायचा चाकू बॅगमध्ये घेऊन तो अमरावतीत आल्यामुळे ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे म्हटले जात आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा