• Tue. Jul 21st, 2026

    Parbhani News : परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत घराणेशाहीला ऊत, संचालक मंडळ राजकारण्यांनी व्यापले

    Parbhani News : परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत घराणेशाहीला ऊत, संचालक मंडळ राजकारण्यांनी व्यापले

    परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत संचालक मंडळात सर्व राजकीय नेत्यांशी संबंधित उमेदवार जिंकून आले आहेत. विशेष म्हणजे आजी-माजी आमदारांच्या घरातील तब्बल 5 जण जिंकून आले आहेत. त्यामुळे राजकीय घराणेशाहीची चर्चा सुरु आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    परभणी : परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील पाच विद्यमान आमदार निवडून आले आहेत. यामध्ये मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार सईद खान, आमदार राजू नवघरे यांचा समावेश आहे. तसेच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार सुरेश वरपूडकर आणि माजी आमदार सुरेश देशमुख हे देखील निवडून आले आहेत.

    विशेष म्हणजे सुरेश वरपूडकर आणि रामप्रसाद बोर्डीकर यांच्याच घरातील तब्बल पाच उमेदवार या संचालक मंडळात निवडून आल्याने परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळामध्ये आजी-माजी आमदारासह घराणेशाहीला ऊत आल्याचे दिसून आले आहे. या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना कसल्याही प्रकारची इंट्री मिळू नये याची खबरदारी मात्र या सर्वच पुढार्‍यांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक सर्वसामान्यांसाठी आहे की पुढार्‍यांसाठी आहे? असा प्रश्न मात्र आता निर्माण झाला आहे.

    13 जागा बिनविरोध, 8 जागांवर निवडणूक

    परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 संचालक पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली. यानंतर आज मतमोजणीनंतर निकाल देखील लागला आहे. बँकेच्या 21 पैकी तब्बल 13 जागांवर संचालक हे बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित केवळ आठ जागांसाठी काल रविवारी मतदान प्रक्रिया संपन्न झाली आणि आज मतमोजणी देखील संपन्न झाली.

    या निवडणुकीमध्ये भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि माजी आमदार सुरेश वरपूडकर या दोघांनी मिळून आपला पॅनल निवडणूक रिंगणात उभा केला होता. त्यामुळे बहुतांश जागांवर बिनविरोध होण्याची प्रक्रिया संपन्न झाली होती. केवळ आठ जागांसाठी चुरशीची निवडणूक झाली आणि त्यामध्ये देखील या दोघांच्या पॅनललाच भरभरून यश मिळाले आहे.

    घराणेशाहीची चर्चा

    असं असलं तरी चर्चा मात्र या बँकेमध्ये निवडून आलेल्या संचालकांचीच होत आहे. परभणी, हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घराणेशाहीला ऊत आल्याचे देखील दिसून आले आहे. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या घरतील तब्बल तीन जण या बँकेवर संचालक म्हणून निवडून गेले आहे.

    रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासोबत मुलगी आमदार मेघना बोर्डीकर तर दुसरी मुलगी भावना बोर्डीकर या संचालक म्हणून निवडून आले आहेत. तर माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्यासोबत त्यांची सुनबाई प्रेरणा वरपूडकर यादेखील मध्यवर्ती बँकेच्या संचालिका म्हणून निवडून आले आहेत.

    हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यात कुटुंबातील राजामती मुटकुळे यादेखील मध्यवर्ती बँकेमध्ये निवडून आले आहेत. तर हिंगोलीचे भैय्या पाटील गोरेगावकर यांच्या घरातील देखील तिघेजण जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवडून आलेले आहेत. त्यामुळे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक ही घराणेशही चालवत असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

    आमदार सईद खान यांनी एकाकी झुंज देत विजय खेचून आणला

    आजी-माजी आमदारांसह घराणेशाहीला ऊत आलेल्या या परभणी हिंगोली मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार असलेल्या आमदार सईद खान यांनी मात्र चुरशीची लढत देत आपला विजय खेचून आणला आहे.

    मागचंबरांच्या पॅनल समोर अपक्ष उमेदवारी अर्ज भरत सईद खान यांनी सुरुवातीपासूनच इतर मतदारसंघांमध्ये चांगलीच चुरस निर्माण केली होती. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय जामकर यांचे कडवे आव्हान त्यांना होते. पण असे असले तरी शहीद खान यांनी सामान्य शिवसैनिकांना सोबत घेऊन विजय जामकर यांचा पराभव केला आहे. केवळ तीन मतांनी आमदार शहीद खान हे विजयी झाले असले तरी मात्र त्यांची चर्चा सर्वत्र झाली असल्याचे दिसून आले आहे.