Mumbai Dahi Handi Festival : भांडुप पश्चिमेकडील लालाशेठ कंपाऊंड, ९० फूट रस्ता, गाढव नाका येथील अशोक केदारे चौकात आज, शनिवारी कोणाचीच दहीहंडी उभी राहणार नसल्याचे मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी घेतलेल्या निर्णयानंतर स्पष्ट झाले. आयोजनावरून आधार श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि मनसेमध्ये असलेल्या वादाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे आयुक्तांनी दोन्ही पक्षकारांची सुनावणी घेऊन हा निर्णय दिला.
यंदा नऊ थरांचे लक्ष्य
गोविंदा पथकांसाठी दिवसाची सुरुवात सकाळीच होणारआहे. ठरलेल्या वेळेत एकत्र येणे, थरांची उजळणी आणि त्यानंतर विविध भागांतील हंड्यांकडे रवाना होणे, अशी त्यांची धावपळ असेल. साईलीला क्रीडा मंडळाचे सुमारे ३०० गोविंदा सकाळी ८ वाजता घराबाहेर पडून ठाणे, घाटकोपर, विक्रोळी, गोरेगाव आदी ठिकाणी हंड्या फोडण्यासाठी जाणार आहेत. गेल्या वर्षी आठ थरांची सलामी देणारे हे पथक यंदा नऊ थरांचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरणार आहे. ‘यंदा नऊ थर लावण्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणारा आमचा दिवस रात्री साडेदहा-अकरापर्यंत चालेल. मध्ये हलका आहार आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे’, असे मंडळाचे सभासद आकाश माने यांनी सांगितले.
Amravati Crime : शर्वरीला फोन करायला सांग, भावाला शाळेत गाठलं, कॉल येताच लोकेशन मिळवलं, एकतर्फी प्रेमाचा जहरी शेवट, कुटुंब स्मशानातून थेट पोलिसात
दहीहंडीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश
यंदाच्या दहीहंडी उत्सवाला पर्यावरणपूरक उपक्रमांचीही जोड मिळाली आहे. दादरमधील आयडियल गल्लीतील आयडियल सेलिब्रिटी व पर्यावरणपूरक दहीहंडीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयडियल बुक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या उत्सवात दिव्यांग आणि अंध गोविंदा पथकेही थर रचणार आहेत.
थरांसोबत सांस्कृतिक देखावेही
उंच थरांच्या चुरशीसोबत सांस्कृतिक देखावेही उत्सवाची रंगत वाढवणार आहेत. दादरमध्ये शिवसागर गोविंदा पथकाकडून तीन थरांवर चौथ्या थरावर बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचा देखावा सादर केला जाणार आहे. विविध मंडळांमध्ये कलाकारांची उपस्थिती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षिसांची चुरस यामुळे उत्सवाला मनोरंजनाची जोड मिळणार आहे.
Thane Dahi HandiFestival: गोविंदा आला रे आला…. ११ थरांच्या दहीहंड्या लागणार; गोविंदांना नवे विक्रम रचण्याचे वेध
सर्वाधिक उंच हंड्या ठाण्यात
मुंबई महानगर प्रदेशातील सर्वांत उंच दहीहंड्यांची सर्वाधिक संख्या ठाणेपरिसरात असल्याने मुंबईसह आसपासच्या सर्वच शहरांमधून गोविंदा पथकांची ठाण्यात सकाळपासून हजेरी लागणार आहे. ठाणे शहरात ५४३ हंड्या असून, त्यात १०३ सार्वजनिक, ४४० खासगी आणि ३४ मोठ्या व मानाच्या हंड्यांच्या समावेश आहे. ११ थरांसाठी २१ लाख, तर १० थरांसाठी ११ लाखांपर्यंतची पारितोषिके या भागातील दहीहंड्यांमध्ये आहेत. त्यामुळे पारितोषिकांसाठी गोविंदा पथकांकडून विक्रमी उंचीचे थर रचण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
बालगोविंदांचा यंदाही भरणा?
दहीहंडीचा जल्लोष दरवर्षी वाढत असताना थरांच्या या स्पर्धेत बालगोविंदांचा समावेशही वाढता आहे. वयोमर्यादेमुळे या गोविंदांना विम्याचे कवच नसते, याकडे लक्ष वेधले जात आहे. यंदाही पथकांकडून बालगोविंदांच्या विम्यासाठी चौकशी झाली होती; मात्र त्यांना विमाकवच मिळालेले नाही.
Dahi Handi 2026: दृष्टीआडची जिद्द, थरांवरची भरारी! 2017पासून महिला गोविंदांची परंपरा; यंदा तीन थरांचे आव्हान पेलणार
एक लाख ६५ हजारांहून अधिक गोविंदांचा विमा
सुरक्षेच्या कारणास्तव १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीच्या थरांमध्ये सहभागी करून घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मानवी मनोऱ्यामध्ये १४ वर्षांच्या वरची मुले असावी, असे अपेक्षित आहे. मात्र विम्याची नोंदणी करायला येताना पथके १४ वर्षांच्या खालच्या मुलांचाही विमा होईल का, याची विचारणा करताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी विम्याच्या कामासाठी येणाऱ्या दहीहंडी पथकांची संख्या मोठी होती. यांमधील गोविंदांच्या आधारकार्डाची तपासणी करून त्यांच्या विम्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. मात्र, यापैकी काही पथकांकडून बालगोविंदांसाठी निर्धारित हप्त्यापेक्षा जास्त पैसे घेऊन विमासंरक्षण देता येईल का, अशीही विचारणा करण्यात येत होती. न्यायालयीन निर्देशानुसार या बालगोविंदांचा विमा नाकारण्यात आल्याचे दी ओरिएंटल इन्श्युरन्स विमा कंपनीतर्फे सांगण्यात आले. मात्र, यामुळे आज, शनिवारी वरच्या थरामध्ये १४ वर्षांखालील बालगोविंदांची संख्या मोठी असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
यंदा सुमारे एक लाख ६५ हजारांहून अधिक गोविंदांचा विमा शुक्रवारी संध्याकाळपर्यंत काढण्यात आला असून, यात एक हजार ९५०हून अधिक पथके सहभागी आहेत. गेल्या वर्षी हा आकडा एक लाख ५५ हजारांपर्यंत पोहोचला होता, तर मंडळांची संख्या एक हजार ८५०च्या आसपास होती.
