• Fri. Jul 17th, 2026

    राज्याच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य; क्वांटम टेक्नॉलॉजी मिशनला शासनाचे पूर्ण सहकार्य – मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 17, 2026
    राज्याच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य; क्वांटम टेक्नॉलॉजी मिशनला शासनाचे पूर्ण सहकार्य – मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    पुणे, दि. १७ : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास, संशोधन आणि क्षमतावृद्धीला शासन प्राधान्य देत असून, महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन तसेच फॅकल्टी डेव्हलपमेंटसारख्या उपक्रमांना शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

    आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशन (I-HUB QTF), आयआयएसईआर पुणे यांच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन – फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत प्रमाणपत्र वितरण व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, आयआयएसईआर पुणेचे संचालक प्रा. सुनील भागवत तसेच राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांतील प्राध्यापक व संशोधक उपस्थित होते.

    मंत्री पाटील म्हणाले, क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असून संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग क्षेत्राला नवी दिशा देण्याची क्षमता त्यात आहे. राज्यात सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शिक्षकांचे कौशल्यवर्धन, संशोधनाला प्रोत्साहन आणि उद्योग व शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अधिक बळकट करणे आवश्यक आहे. या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी शासन निधीची कमतरता भासू देणार नाही. आवश्यकतेनुसार केंद्र शासनाकडूनही सहकार्य मिळवून दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

    प्रा. सुनील भागवत यांनी महाराष्ट्रात क्वांटम तंत्रज्ञानाचा प्रसार, संशोधनाला चालना आणि भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. शासनाच्या सहकार्यामुळे महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशनला अधिक बळ मिळेल आणि राज्य तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री पाटील यांच्या हस्ते फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed