- पाच लाखांची मदत त्वरित मिळवण्यासाठी प्रयत्नशील; जखमींच्या उपचाराचा पूर्ण खर्च मोफत
सांगली, दि. १३ (जि. मा. का.) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात आज सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर काही वारकरी जखमी झाले. या घटनेबद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या घटनेनंतर अपघातातील मृतांना पाच लाखांची मदत जाहीर झाली आहे. तर जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हा स्तरावरील प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करुन; राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
ह्या दुर्घटनेत राजश्री शंकर भोसले (वय ६२), रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली, माधवी राजाराम सरवडे (वय ५५), रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली, नंदा बाबुराव पवार (वय ५२), रा. डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली. ह्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मृताप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच जखमी वारकऱ्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी विठ्ठलचरणी प्रार्थना व्यक्त केली आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, वारकऱ्यांची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण वारी मार्गावर आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचारांची माहिती घेत जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
000000
