Monsoon Update: पुण्यात मोसमी वारे दाखल झाले असून मुंबईत मंगळावरी सकाळपासून अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. येत्या ४८ तासांमध्ये राज्यात सर्वत्र मान्सून दाखल होणार असून अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातील मंगळवारचं हवामान कसं असेल?
मुंबईत मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढत चालला आहे. हवामान विभागाकडून मुंबईसह उपनगरांमध्ये मंगळवारसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. नवी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये दिवसभर विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. दिवसभर वादळी वाऱ्यांमुळे पावसाचा वेग वाढण्याचा अंदाज आहे.
४८ तास हवामान कसं असेल?
नैर्ऋत्य मोसमी पाऊस सोमवारी पुण्यात दाखल झाल्याचे सोमवारी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे सक्रिय झालेल्या मान्सूनचे वारे पुण्यापर्यंत पोहोचले असले, तरी शहरात दिवसभरात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाची आनंदाची बातमी मिळूनही पुणेकरांचा हिरमोड झाला. पुढील दोन दिवस दुपारनंतर आकाश मुख्यतः ढगाळ राहणार असून, संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ‘आएमडी’ने व्यक्त केली आहे.
शहर आणि परिसरात, जिल्ह्यातही अनेक ठिकाणी रविवारी संध्याकाळी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. त्यामुळे हवेत गारवा आला होता. २१ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस पडल्याने पुणेकरही सुखावले होते. सोमवारीदेखील शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उकाडाही वाढला होता. आजही संध्याकाळी पाऊस पडणार, अशी नागरिकांना अपेक्षा होती. सायंकाळी सहाच्या सुमारास वाराही सुटला होता; पण शहरात सरी बरसल्या नाहीत. जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली. शिरूर तालुक्यात दुपारी जोरदार पाऊस पडला. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कमाल आणि तापमानात मात्र घट नोंदविण्यात आली. दिवसभरात कमाल ३२ आणि किमान २३.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी वातावरण अनुकूल असल्याने पुढील चार दिवसांत राज्याचा अजून काही भाग मान्सून व्यापणार आहे. पुणे जिल्ह्यातही पावसाला अनुकूल वातावरण असल्याचे आयएमडीने सांगितले.
नाशिक जिल्ह्यात वरुणराजाचे आगमन
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील बहुतांष भागात सोमवारी (दि. २२) पावसाने हजेरी लावली. त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस झाला, तर सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये समाधानकारक पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला असला, तरी तालुक्यातील बहुतांश भाग अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मालेगाव, चांदवड, येवल्यासह बागलाणच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली.
विदर्भातील हवामान कसं असेल ?
विदर्भात सध्या राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी विदर्भातील कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. राज्यातील सर्वात उष्ण भागांपैकी एक हा आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’?
छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी जोरदार पावसामुळे नदीला अक्षरशः पूर आला होता. राज्यात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून बुलढाणा, वाशिम, हिंगोली जिल्ह्यांमध्येही पावसाने हजेरी लावली. आज दिवसभर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सून तूट भरणार का?
पुण्यात मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होते आणि एक ते २२ जून या कालावधीत सरासरी १०८ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा मे महिन्यात वळवाचा पाऊस कमी पडला. जूनमध्ये एकही दिवस पाऊस पडला नव्हता. रविवारी (२२ जून) या हंगामातील पहिल्या पावसाची नोंद झाली. दिवसभरात १८ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. पुढील आठ दिवसांत मान्सून महिनाभराची ही मोठी तूट भरून काढणार का, याची नागरिकांसह प्रशासनालाही प्रतीक्षा आहे.
