शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना भावनिक साद घातली. पक्षातील फुटीवर भाष्य करत असताना त्यांनी आपण पक्षप्रमुख पद सोडायला तयार असल्याचं म्हटलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी आदित्य ठाकरे हे देखील मंचावर प्रचंड भावूक झालेले बघायला मिळाले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुंबईत दोन्ही शिवसेनेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 पैकी 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याची चर्चा आहे. ते वेगळा गट स्थापन करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ आलं आहे. या वादळात तग धरुन उभं राहणं हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर मोठं आव्हान आहे. या घडामोडींवर उद्धव ठाकरे आपली पहिली प्रतिक्रिया काय देणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे या पक्षफोडीवरुन भाजप आणि शिंदे गटावर चौफेर टीका केली. पण याचवेळी त्यांनी शिवसैनिकांना भावनिक साद केली. ही साद घालत असताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं. आपण पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी आज शेवटी तुम्हाला विचारतोय. आजपर्यंत तुम्ही मला जपलंत कारण शिवसेनाप्रमुखांचा आदेश. शिवसेनाप्रमुखांनी जसं सांगितलं की, जसं तुम्ही मला जपलंत तसं उद्धवला सांभाळा. आदित्यला सांभाळा. तसं मी आज तुम्हाला सांगतोय. मी कसा आहे ते तुम्हाला माहिती आहे. माझ्या माणसाने माझ्यावर बोट दाखवलं तर मी एक क्षणही तिकडे राहणार नाही. म्हणून मी मुख्यमंत्रीपद सोडलं आणि ‘वर्षा’ बंगला सोडून ‘मातोश्री’ला गेलो. त्यामुळे नाटक म्हणून मला कधी जमलेलं नाही. हे करण्याची गरज नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मला जर काही पाहिजे असतं तर आजसुद्धा मी विधान परिषदेत जावून बसलो असतो. पण मी नाही गेलो. म्हणून मी आज तुम्हाला सांगतोय. विचार करुन उत्तर द्या. शिवसेनेला 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेली 12 ते 13 वर्षे नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. पण जे आरोप आज माझ्यावर होत आहेत, ते तुम्हाला खरे वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आता या पदावरुन पायउतार व्हायला तयार आहे”, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.
“माझी एक अट आहे, सोन्यासारखी शिवसेना चोराच्या आणि दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या. तो शिवसेना पक्षप्रमुख होईल. मला त्याचं कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची हाव नाही. मी आता हे पद सोडायला तयार आहे. पण कुणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावर आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे”, असं उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केलं.
यावेळी शिवसैनिकांनी पक्षप्रमुख पद सोडू नका, असं आवाहन केलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली. “मी डगमगलेलो नाही. मी खचणारा नाहीय. अनेक संकट, अनेक वादळं आली. मी पळणारा नाहीय. पहाडासारखा उभा राहीन. जबाबदारी स्वीकारेन. पण तुमचा जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच मी करेन. ज्यावेळेला तुम्हाला विश्वास वाटणार नाही त्यावेळी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पंजोबा सीताराम ठाकरेंनी प्लेगच्या साथीत योगदान दिल्याचा दाखला
“आमच्या घराण्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंतचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. पण प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे कुणाला माहिती आहे का? कुणालाच माहिती नाहीत. माहिती असतील कसे? कारण जसा करोना आला होता तसा त्यावेळेला प्लेग आला होता. त्यावेळी आमचं घराणं पनवेलमध्ये राहायचं. प्लेग म्हणजे काय लागला की गेला. कुणाला लागण झाली की निधन झालं. त्यावेळी मृतदेह वाहून नेण्यासाठी कुणाची तयारी होत नव्हती. तेव्हा प्रबोधनकारांचे वडील सीताराम ठाकरे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी हे मृतदेह वाहण्याचं काम केलं. त्यामध्ये प्लेग होऊन ते गेले. आहे कुणाच्या घराण्याचा असा इतिहास? आमच्या अंगावर येता?”, असे सवाल उद्धव ठाकरेंनी केले.
उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला
“हा विषय केवळ शिवसेनेचा नाहीय. शिवसेना का पाहिजे? एकतर शिवसेना हवी की नको? हा विषय सर्वांना करा. महाराष्ट्राने केला पाहिजे. ठिक आहे, मी जिल्हा परिषद निवडणुकीला नाही फिरलो. त्याचं कारण, माझे सस्थानिक नेते उभे राहिले पाहिजेत. त्यांच्या जीवावर तुम्ही शिवसेना स्थानिक पातळीवर सोपवणार आहात की नाही? की प्रत्येक वेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान येतात, अगदी दूध संघाच्या निवडणुकीला आणि म्हणतात, भाईयो और बहनों…”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
“माझे स्थानिक लोकं आहेत कुठे? अरे तुम्ही आमदार, खासदार आहात. लढवा ना निवडणूक. लढा. पण ज्यावेळेला मराठवाड्यात आपत्ती आली होती, शेतकऱ्यांची जमीनच्या जमीन वाहून गेली होती. महापुरामध्ये घरे, भांडीकुंडी, वह्या-पुस्तके वाहून गेली. तेव्हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुणी आले नव्हते. मी आणि माझ्याबरोबर अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, सगळे आमदार-खासदार आणि शिवसैनिक मदतीला धावून गेले होते. मी मुख्यमंत्री होतो, हे सांगावं का लागतंय? कारण लोकं विसरतात. कुणीही न मागता, तीसुद्धा एकही प्रश्न न ठेवता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. 10 रुपयांत शिवभोजन दिलं होतं. कोरोनामध्ये काय केलं होतं? ते तुम्हाला माहिती आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा