Eknath Shinde: उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरवर सूचक भाष्य केलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: शिवसेनेच्या दोन्ही गटांचा ६० वा वर्धापनदिन सोहळा आज संपन्न होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापनदिन सोहळा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये संपन्न होत आहे. सेनेच्या वर्धापन दिनापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदारांनी त्यांची साथ सोडली. हे ६ खासदार शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. या ऑपरेशन टायगरबद्दल शिंदे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ठाकरेंची साथ सोडलेल्या ६ खासदारांच्या पक्षप्रवेशाची घोषणा शिंदे करणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं.
ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अशा सूचक शब्दांत एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरवर भाष्य केलं. माझ्या समोर बसलेले शिवसैनिक हीच माझी संपत्ती आहे. व्यासपीठावरील बसलेले सगळे नेते, मंत्री, आमदार, खासदार हेच माझं ऐश्वर्य आहे, असं शिंदे म्हणाले. आज बऱ्याच जणांच्या नजरा आपल्याकडे लागल्या आहेत. मी नेमकं काय बोलणार, व्यासपीठावर कोण येणार, काय होणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पण आज हा टायगर तुमच्या समोर उभा आहे. ये तो सिर्फ पिक्चर है, ट्रेलर अभी बाकी है, असं सूचक विधान त्यांनी केलं. Uddhav Thackeray : सहा खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘हा लोकशाहीला धोका, देश आराजकतेच्या दिशेला’ माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आले. मी ते ६० केले. आज शिवसेनेचे ६० आमदार आहेत. शिवसेना राज्यातील दुसरा क्रमांकाचा पक्ष आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांना आनंद होत असेल. ते स्वर्गातून आपल्याकडे पाहत असतील आणि आशीर्वाद देत असतील. बाळासाहेब केवळ नावात असून चालत नाही. तर ते कामात आणि विचारातही असावे लागतात. शिवसेना जमिनीचा तुकडा नाही. तो काळजाचा तुकडा आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली. Shrikant Shinde : उबाठामध्ये पुन्हा बंडखोरी का झाली? एकनाथ शिंदेंच्या भाषणापूर्वीच श्रीकांत शिंदेंचा ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठा खुलासा काल परवापासून काही कुत्रे रोज भुंकत आहेत. कुत्रे झुंडीनं येतात. वाघ एकटाच येतो. कुत्रे भोगतात, टायगर शिकार करतो. आमची शिवसेना बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे. माझ्या पाठीशी कोणीही गॉडफादर नव्हता. पण कार्यकर्त्याला आमदार, खासदार, मंत्री, अगदी मुख्यमंत्रीदेखील होऊ शकतो. हीच शिवसेनेची किमया आहे आणि हे केवळ शिवसेनेतच होऊ शकतं. बाळासाहेब कायम म्हणायचे, शिवसैनिक हेच मोठं पद आहे. त्याला कोणीही हटवू शकत नाही. त्यामुळे शिवसैनिकाला जपलं पाहिजे. निवडणुकीत आवडता असलेला कार्यकर्ता नंतर नावडता होता कामा नये. कारण हेच कार्यकर्ते आपल्याला निवडून देत असतात, असे सल्ला त्यांनी उपस्थित नेत्यांना दिला.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा