• Wed. Jun 10th, 2026
    Jalgaon Accident: एका डुलकीने सहा जणांचा जीव गेला! कारचालक झोपेत होता, बस चालकाने सांगितला जळगाव अपघाताचा थरार

    Jalgaon Accident: एका डुलकीची किंमत सहा जणांना जीव गमावून मोजावी लागली आहे. जळगावच्या भीषण तिहेरी अपघातामागील धक्कादायक कारण समोर आले असून बस चालकाने अपघाताचा थरारक घटनाक्रम सांगितला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव: गुजरातहून साखरपुड्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांच्या कारचा आज सकाळी भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अन्य एक जण जखमी आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती आता समोर आली आहे. कारचालकाला डुलकी लागल्याने हा भीषण अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र अनेक जण नियमांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशाच निष्काळजीपणामुळे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ आज सकाळी कार, दुचाकी आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

    एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश

    या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश असून यामध्ये दोन सख्खी भाऊ आणि त्यांच्या पत्नी देराणी जेठानी आहेत. गुजरातमधील व्यारा येथून महाजन कुटुंब कारने अमळनेर येथे राहणाऱ्या भाच्याच्या साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी निघाले होते. अंमळनेर अवघ्या पाच किलोमीटर अंतर अर्थात दहा मिनिटाच्या प्रवास बाकी होता महाजन कुटुंबालाही काय माहित नव्हते की रस्त्यात इतकी दुर्दैवी घटना घडेल.

    धुळ्याकडून अमळनेरकडे जाणाऱ्या भरधाव बलेनो कारने सुरुवातीला समोर चालणाऱ्या दुचाकी ला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी थेट हवेत उडून अंमळनेर डेपोच्या समोरून येणारे एसटी बसवर जाऊन आदळली. त्यानंतर कार थेट विरुद्ध दिशेने येणारा एसटी बसला जाऊन धडकली. अपघातात कार पूर्णपणे चक्काचूर झाली. कारमधील चार जण आणि दुचाकी वरील दोन जण असे एकूण सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यामध्ये सुरेश विक्रम महाजन, अनिता सुरेश महाजन, नंदलाल गोपाल महाजन ,निर्मलाबाई नंदलाल महाजन आणि दुचाकी वरील निलेश सुखदेव तावडे (वय २५) आणि फाल्गुनी एकनाथ भोई(२७) यांचा समावेश आहे.

    बसमधील प्रवासी सुरक्षित

    घटनेनंतर अपघातग्रस्त बसमध्ये एकूण ३५ प्रवासी असल्याची माहिती समोर आली. कार बसला धडकल्यानंतर बसचालकाने वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा आणखी मोठा अनर्थ घडला असता.

    बसचालकाने सांगितले कारण

    अपघाताच्या वेळी नेमके काय घडले याबाबत बसचालकाने माहिती दिली. कारचालक झोपेत डुलक्या देत असल्यामुळे हा अपघात झाला, असा दावा त्याने केला आहे. “कारचालक झोपेत होता. त्याला मी हॉर्न दिला, लाईट ऑफ-डिपरही केले. मात्र त्यानंतर कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला उडवले आणि नंतर बसवर येऊन धडक दिली,” अशी माहिती बसचालकाने दिली.

    “कार बसवर धडकल्यानंतर मी वेळीच नियंत्रण मिळवले. बसमध्ये ३५ प्रवासी होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली,” असेही बसचालकाने सांगितले. या दुर्दैवी अपघातानंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही होत आहे.

    वाहतूक करताना नियमांचे पालन करणे गरजेचे

    दरम्यान, वाहन चालवताना झोप येत असल्यास गाडी थांबवून काही वेळ विश्रांती घेणे आवश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे, अन्यथा अशा दुर्घटना पुन्हा घडू शकतात.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा