Rain Alert Maharashtra: उकाड्याने हैरान असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आता खुशखबर आली आहे. ३० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुण्यासह अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
३० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
हवामान विभागाने ९-१० जून रोजी राज्यातील ३० जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे.
या भागांमध्ये काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
चार दिवस पावसाची शक्यता
पावसाचा हा प्रभाव केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. १० ते १३ जूनदरम्यान मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची मालिका कायम राहू शकते. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता असल्याने काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नाशिक आणि अहमदनगरमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्या सरी कोसळू शकतात. मात्र, पाऊस पडूनही विदर्भ आणि खान्देशातील उष्णतेत फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नसून तापमान ४० अंशांच्या पुढेच राहू शकते.
पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला
राज्यात मान्सूनपूर्व हालचाली वाढल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. सर्वत्र समाधानकारक आणि सलग पाऊस झाल्यानंतरच खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात करावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामानशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले की, सध्या मराठवाड्यातील वातावरणामुळे मान्सूनच्या प्रगतीवर काही प्रमाणात परिणाम होत आहे. मात्र, १२ ते १८ जूनदरम्यान मान्सून संपूर्ण मराठवाडा व्यापण्याची शक्यता आहे.
विजांच्या कडाडताना खबरदारी घ्या
हवामान विभागाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात किंवा मोकळ्या मैदानात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा कच्च्या शेडमध्ये आश्रय घेऊ नये, कारण अशा ठिकाणी वीज पडण्याचा धोका अधिक असतो.
विजांचा कडकडाट सुरू असताना घरातील विजेची उपकरणे प्लगमधून काढून ठेवावीत. तसेच नदी, तलाव किंवा इतर जलस्रोतांमध्ये असलेल्यांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
