• Sun. Jun 7th, 2026

    सुविधा नसताना ठाण्यात ‘डबल डेकर बस’चं लोकार्पण, महिना उलटूनही बस आगारात धूळखात; घोडबंदरवर प्रवाशांचे हाल

    सुविधा नसताना ठाण्यात ‘डबल डेकर बस’चं लोकार्पण, महिना उलटूनही बस आगारात धूळखात; घोडबंदरवर प्रवाशांचे हाल

    Thane News: ठाण्यात मे महिनयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत डबल डेकर बसचं लोकार्पण झालं. ही शहरातील पहिली अशी बस असल्यामुळे नागरिक प्रवास करण्यासाठी उत्सुक होते. पण महिना उलटूनही अजून ही बस सेवेत दाखल नाही झाली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी करण्यात आले. मात्र, तब्बल महिना उलटूनही ही डबल डेकर बस घोडबंदर रोड येथील आनंदनगर आगारात धूळखात पडून आहे. स्वतंत्र चार्जिंग स्टेशनच्या अभावामुळे ही बस नियमित सेवेत दाखल होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे परिवहन सेवेच्या वागळे आगाराला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

    यावेळी उपलब्ध जागेची पाहणी करून चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच चार्जिंग स्टेशन पूर्णत्वास येईपर्यंत पर्यायी चार्जिंग व्यवस्था उपलब्ध करून बस लवकरात लवकर प्रवासी सेवेत दाखल करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करण्याबाबत महापौरांनी चर्चा केली. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत दाखल झालेल्या पहिल्या वातानुकूलित डबल डेकर ई-बससह आगामी ई-बस आणि सीएनजी बस प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा महापौर पिंपळोलकर यांनी गुरुवारी वागळे येथील परिवहन आगारात घेतला. यावेळी सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक अनिल भोर, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे तसेच परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे परिवहन सेवेतील पहिल्या वातानुकूलित डबल डेकर ई-बसचे लोकार्पण करण्यात आले होते. या बसची प्रात्यक्षिक चाचणीही घेण्यात आली होती. मात्र, नियमित सेवेसाठी आवश्यक असलेल्या स्वतंत्र चार्जिंग स्टेशनच्या अभावी ही बस सध्या आनंदनगर आगारात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बसच्या परिचालनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापौरांनी ही पाहणी केली.

    Maharashtra TimesMumbai Metro: महामुंबईत 14 मार्गांवर 300 किमी लांब ‘मेट्रो नेटवर्क’ उभारणार; वर्षाअखेरीस 120 किमीचा टप्पा होणार पार

    पर्यायी उपायांवर चर्चा

    डबल डेकर, ई-बस आणि सीएनजी बससाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. काही तांत्रिक बाबी निदर्शनास आल्या असून याबाबत संबंधित विभाग, महावितरण व कंत्राटदार संस्थांशी समन्वय साधला जात आहे. चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी काही कालावधी लागू शकतो. मात्र, बससेवा सुरू व्हावी, यासाठी पर्यायी उपायांवर विचार सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

    निर्धारित वेळेत कामे पूर्ण करा

    राज्य सरकारच्या आदेशानुसार ठाणे परिवहन सेवेत आगामी काळात डबल डेकर ई-बस तसेच १०० सीएनजी बसचा समावेश करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बस आगारातील कामे, चार्जिंग स्टेशन उभारणी, सीएनजी सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. चार्जिंग स्टेशन उभारणी, बस उपलब्धता आणि सेवा सुरू करण्यासंदर्भातील जबाबदाऱ्या कंत्राटदार संस्थेने निर्धारित वेळेत पूर्ण कराव्यात, याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती सभागृहनेते हणमंत जगदाळे यांनी दिली. तसेच प्रकल्पाशी संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार संस्थेला दिले.

    Maharashtra TimesGoregaon-Mulund Link Roadवरील जुळ्या बोगद्यांचं काम सुरू होणार, शहरातील चौथा ‘ईस्ट-वेस्ट’ कॉरिडोर; डेडलाइन समोर

    पाहणीनंतर आढावा बैठक

    महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ई-बस, डबल डेकर ई-बस तसेच आगामी सीएनजी बस सेवांसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन, इंधन सुविधा आणि इतर तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. डबल डेकर ई-बससाठी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी आवश्यक जागा, वीजपुरवठा आणि तांत्रिक बाबींचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा