• Sun. Sep 13th, 2026

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची मुंबईकडे कूच करण्याची तारीख जाहीर; राज्यभरातील मराठा बांधवांना महत्त्वाचं आवाहन

योगेश काकफळे, जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख जाहीर केली आहे. 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. मुंबईत पोहोचल्यानंतर आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाचा संभाव्य मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणेही जाहीर केली आहेत. त्यानुसार 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून निघून पाटोदा, जिल्हा बीड येथे मुक्काम, 16 सप्टेंबर रोजी श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर, 17 सप्टेंबर रोजी हडपसर, पुणे, तर 18 सप्टेंबर रोजी खोपोली किंवा कोपर खैराणे परिसरात मुक्काम करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली.

मुंबईकडे जाणाऱ्या मराठा समाज बांधवांनी एकाच मार्गाने आणि शिस्तीत पुढे जावे, मार्ग बदलू नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. आंदोलनादरम्यान शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणीही दगडफेक करू नये किंवा कायद्याचे उल्लंघन करू नये. अंतरवाली सराटी येथून निघाल्यापासून ते मुंबईतील आंदोलन आणि आरक्षण घेऊन परत येईपर्यंत आंदोलन शांततेच्या मार्गानेच केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेबद्दल जरांगे पाटील यांनी न्यायालयाचे आभार मानले. न्यायदेवता गोरगरिबांवर अन्याय करत नाही आणि सरकारकडून अन्याय होत असला तरी न्यायालय आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे सर्व मराठा समाज बांधवांनी न्यायदेवतेचा सन्मान राखावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या मराठा बांधवांना पोलिसांनी किंवा प्रशासनाने अडथळे निर्माण करू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली. गृहमंत्री आणि पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड लावून मराठा बांधवांना अडवू नये, आम्हाला लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आमचा हक्क मिळवायचा आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. मुंबईला येणे शक्य नसलेल्या मराठा बांधवांनी घरी बसून राहण्याऐवजी मुख्य रस्त्यावर येऊन आंदोलनकर्त्यांचे स्वागत करावे आणि आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आर्थिक अडचण असलेल्या समाजबांधवांनी कर्ज काढून मुंबईला येऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशूनही भूमिका मांडली. सरकारने जे नियम घातले जातील ते आम्ही पाळण्यास तयार आहोत, मात्र आंदोलन मुंबईतच होणार, असे त्यांनी सांगितले. तसेच, “फक्त माझं हे आंदोलन पूर्ण होऊ द्या, मराठवाड्यात संपूर्ण जायकवाडीच्या धरणाचं पाणी फिरवतो,” अशी नवी घोषणा त्यांनी केली.

10 मिनिटात महाराष्ट्र बंद करा

आंदोलनादरम्यान एखाद्या मराठा तरुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला किंवा रक्त सांडले तर महाराष्ट्रात शांततेच्या मार्गाने 10 मिनिटांत बंद पाळला गेला पाहिजे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. तालुक्याच्या ठिकाणी मराठा समाजाने ठिय्या आंदोलन करावे आणि आंदोलन शांततेत सुरू ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

“मुंबईला येऊन आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही,” असा निर्धार व्यक्त करताना जरांगे पाटील यांनी आंदोलनाची लढाई सोपी नसल्याचेही म्हटले. मराठा समाजासाठी आपण शेवटपर्यंत लढणार असल्याचे सांगताना ते भावनिक झाले. एकूणच, अंतरवाली सराटी येथील उपोषणानंतर आता 15 सप्टेंबरपासून मुंबईकडे कूच आणि 19 सप्टेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण असा पुढील आंदोलनाचा टप्पा निश्चित केला आहे. या बैठकीच्या वेळी मनोज जरांगे यांनी समाज बांधवांशी संवाद साधत हे निर्णय घेतले. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव आंतरवाली सराटी येथे दाखल झाला होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed